कडेगाव : एक तेरा कदम, एक मेरा कदम, मिल जाए अपना वतन'हा विचार घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मार्गक्रमण करीत आहे. या यात्रेत सांगली जिल्ह्यातील १२ हजार कार्यकर्ते टप्प्याटप्प्याने सहभागी होत आहेत. पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम स्वतः महाराष्ट्रात यात्रा मार्गावर ३८४ किमी चालणार आहेत. यानिमित्ताने कदम यांच्या बुलडाणा ते सांगली पदयात्रेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.जनतेशी संवादाची तार जोडत राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड , हिंगोली, वाशीम, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातून जात असली तरी सांगली जिल्ह्यातील कार्यकर्तेही या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे या यात्रेत विश्वजित कदम यांच्या पलूस कडेगाव मतदारसंघातील ४ हजार कार्यकर्ते सहभागी होत आहेत. विश्वजित कदम यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना बुलढाणा ते सांगली अशी ५३२ किमीची संवाद पदयात्रा काढली होती. सन २०१३ मध्ये ११ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत"एक पाऊल संवेदनेचे दुष्काळाच्या सावटातून सावरण्याचे"ही टॅग लाईन घेऊन निघालेल्या संवाद पदयात्रेच्या आठवणी भारत जोडो यात्रेच्यानिमित्ताने पुन्हा जाग्या झाल्या आहेत. या यात्रेत सहभागी झालेले बहुतांशी कार्यकर्ते आता पुन्हा भारत जोडो यात्रेतसहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.२०१३ मध्ये काँग्रेसच्या सत्ताकाळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या आदेशानुसार कदम यांनी ही पदयात्रा काढली होती. यावेळी पदयात्रेच्या माध्यमातून मांडलेले दुष्काळ ग्रस्तांचे ज्वलंत प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात आले. ती संवाद पदयात्रा बार्शी येथे आली असताना राहुल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांशीसंवाद साधला होता. आता तरदस्तुरखुद्द राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असल्याने कार्यकर्ते अधिक उत्साहाने या यात्रेत सहभागी होत आहेत.
'भारत जोडो'त एक तेरा कदम, एक मेरा कदम, सांगलीतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 12:47 PM