अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीची ताकद संपविण्यासाठी आ. जयंत पाटील यांचे विरोधक एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. यासाठी भाजपकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. निशिकांत पाटील यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांची भेट घेऊन ‘आम्ही तुमचे सैनिक आहोत’, असे जाहीर करून जयंत पाटील यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा डाव आखला आहे.
बागणी जिल्हा परिषद मतदार संघात सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांच्यारूपाने दाखवलेली ताकद भाजपला ऊर्जा देऊन गेली आहे. जिल्हा परिषदेला विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे यांनी सागर खोत यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्याच वैभव शिंदे यांना भाजपमध्ये घेऊन खोत यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला होता. आता खुद्द विलासराव शिंदे यांनाच खेचण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी आष्टा अप्पर तहसील कार्यालयाचे राजकारण सुरू आहे.
शिराळा मतदार संघातील वाळवा तालुक्यातील ४९ गावांचे राजकारण नेहमीच चर्चेत असते. यामध्ये राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरते. आता इस्लामपूर मतदारसंघात तसे चित्र निर्माण झाले आहे. येथील आष्टा, वाळवा व कोरेगाव या तीन मंडलातील २७ गावे नव्याने स्थापन झालेल्या आष्टा अप्पर तहसील कार्यालयाला जोडली गेली आहेत; तर डिग्रज मंडलातील आठ गावे मिरज तहसीलला जोडली आहेत. या परिसरात वसंतदादा घराण्याचे वर्चस्व होते. परंतु प्रतीक पाटील, विशाल पाटील यांच्या भूमिकांमुळे ही गावे आता काँग्रेसपासून काहीशी दुरावली आहेत, तर वैभव शिंदे यांच्या मदतीने खोत आणि निशिकांत पाटील यांचा संपर्क वाढत चालला आहे. आता खोत आणि पाटील यांनी विलासराव शिंदे यांच्याशीच जवळीक वाढवून जयंत पाटील यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत.शिंदे यांचे स्वप्न पूर्णआष्टा स्वतंत्र तालुका व्हावा, अशी विलासराव शिंदे यांची इच्छा होती. परंतु त्यांच्या पक्षाची सत्ता असताना त्यांना ते जमले नाही. भाजपने मात्र अल्पावधित आष्टा अप्पर तहसीलची निर्मिती करून शिंदे यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे. आम्ही त्यांचेच सैनिक आहोत, असे मानतो, असे मत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी व्यक्त केले.आष्टा (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचा सत्कार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी वैभव शिंदे, प्रसाद पाटील, स्वरूप पाटील उपस्थित होते.