सावंतपूर : महापूर ओसरताच पूरबाधित गावांतील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत पतंगराव कदम यांच्यावतीने भारती विद्यापीठाकडून कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पलुस तालुक्यातील कृष्णाकाठच्या महापूरबाधित बावीस गावांत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
भारती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय मदत व उपचार पथक गावोगावी फिरून पूरग्रस्तांची मोफत तपासणी व उपचार करीत आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफसह ४१६ जणांची निवड करण्यात आली असून त्यांची १४ पथके तयार करण्यात आली आहेत.
या आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिक उपचारासाठी गर्दी करत आहेत. स्वतः राज्यमंत्री विश्वजीत कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड शिबिरांना भेटी देऊन आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करत आहेत.