लोकमत न्यूज नेटवर्क
बाेरगाव : कृष्णा कारखान्याच्या पैशातून उभारलेला कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट व अनेक सहकारी संस्था स्वत:च्या मालकीच्या करणाऱ्या भाेसले पिता-पुत्रांना सभासद या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केले.
मसुचीवाडी (ता. वाळवा) येथे झालेल्या बैठकीत ते म्हणाले की, कृष्णा कारखान्याचे खासगीकरण करण्याचा भोसले पिता-पुत्रांचा डाव मोडून काढायला हवा.
कृष्णा कारखान्याची तोडणी यंत्रणा जयवंत शुगरला का वापरली जाते. अतुल भोसले हे कारखान्याचे संचालक नाहीत, तर मग तीस लाख रुपये खर्चून त्यांची कारखाना कार्यस्थळावर केबीन का केली जाते.
सुरेश भोसले व अतुल भोसले हे आम्ही ५८ कोटींचा अपहार केल्याचे सांगतात. आम्ही जर इतका मोठा अपहार केला असता, तर आमचा नवीन साखर कारखानाच उभारला असता. निवडणूक रिंगणातच उतरलो नसतो.
शेतकऱ्यांसाठी आम्ही कृषी प्रदर्शन आयोजित करत होतो, तर यांनी फक्त आमच्या वडिलांचे नाव दिले म्हणून ते बंद ठेवले.
आमच्या काळात डिस्टिलरीचा नफा २५ कोटी होता. यांच्या सत्ता काळात ताे ५ कोटीही दिसत नाही. सहा हजार विरोध करणारे सभासद अपात्र ठरवून यांनी एक गुंठाही जमीन नावावर नसलेल्या लोकांना सत्तेसाठी सभासद करून घेतले. सभासदांच्या ठेवी, व्याज, भाग विकास, ऊस विकास निधी, कारखान्याचे स्कूल, ट्रस्ट, मयूर कुक्कुटपालन व त्याची जमीन, कृषी संघ, काॅलेज हडप करणाऱ्या या लुटारूंच्या टोळीला या निवडणुकीत सभासद त्यांची जागा दाखवतील. कृष्णा कारखाना ५० कोटींत उभारला गेला; पण कृष्णाच्या सत्तेच्या चाव्या भावा-भावात वाटून घेऊन त्यांनी नुसती प्रॉपर्टी केली.
यावेळी माजी संचालक उदयसिंह शिंदे, विक्रमसिंह पाटील आदी उपस्थित हाेते.