अशोक पाटील -- इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी पहिल्यादिवशी २0 अर्जांची मागणी झाली. परंतु यात सर्व नवखे कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी चुरस दिसत आहे, तर खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीविरोधात मोट बांधण्याचा दावा केला असला तरी, या विरोधी गटात सन्नाटा आहे.इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राष्ट्रवादीतून नगराध्यक्ष पदासाठी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कार्यालयात शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेऊन सुकाणू समिती स्थापन केली आहे. या समितीत पूर्वीप्रमाणेच प्रत्येक गटाला आणि ज्येष्ठ नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. परंतु या समितीतीलच बहुतांशी सदस्य राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी युवकांची रेलचेल असणार आहे. परंतु जयंत पाटील विद्यमान नगरसेवकांनाच संधी देतील अशी शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्ष पदासाठी पक्षप्रतोद पाटील, तर नगरसेवक पदासाठी बी. ए. पाटील, अॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव, संजय कोरे, सुभाष सूर्यवंशी, शहाजीबापू पाटील, अॅड. संपत पाटील, आनंदराव मलगुंडे, सौ. अरुणादेवी पाटील, सौ. मनीषा पाटील, सौ. सीमा इदाते, सौ. नीलिमा कुशिरे, कविता पाटील, शुभांगी शेळके या विद्यमान नगरसेवकांची नावे आघाडीवर आहेत.विरोधी गटात मात्र स्मशानशांतता आहे. खासदार राजू शेट्टी यांनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, शिवसेनेचे आनंदराव पवार, भाजपचे बाबासाहेब सूर्यवंशी एकत्रित निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. परंतु भाजपचे विक्रमभाऊ पाटील, काँग्रेसचे वैभव पवार आघाडीच्या निर्णयाबाबत अद्याप ठाम नाहीत. खा. शेट्टी यांनी वरिष्ठ पातळीवरुन सूत्रे हलवून सर्वांना आघाडीत घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.विरोधी गटाकडून नगराध्यक्षपदासाठी एल. एन. शहा यांचे नाव आघाडीवर आहे. शहा यांनी नकार दिला, तर विक्रमभाऊ पाटील, वैभव पवार यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सतीश महाडिक, जलाल मुल्ला, विजय कुंभार, चेतन शिंदे, सोमनाथ फल्ले, गजानन फल्ले, सनी खराडे, दादा पाटील ही नावे नगरसेवकपदासाठी चर्चेत आहेत.दोन महिलांची नावे आघाडीवर विरोधी गटाकडून नगराध्यक्षपदासाठी महिलांमधून अॅड. शुभांगी पाटील, सुनीता महाडिक या दोन नावांव्यतिरिक्त नावे नाहीत. अद्याप कोणत्याही नावावर शिक्कमोर्तब झालेला नाही. त्याकडे सर्वाचे लक्ष लागृून राहिलेले आहे. त्यामुळे विरोधी गटात आजतरी सन्नाटा दिसत आहे. कोण काय म्हणाले?सत्ताधारी विरोधकांत फूट पाडण्यासाठी प्रयत्न करतील. अशा राजकीय डावांचा विचार करून भाजपचे विक्रमभाऊ पाटील यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवू नये. त्यांनी आघाडीत सामील होऊन विरोधकांची ताकद वाढवावी.- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्रीनगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच पक्षातून उभे राहण्यासाठी पहिल्याचदिवशी राष्ट्रवादी कार्यालयातून २0 इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. जो पक्षाचा क्रियाशील सभासद असेल, त्यालाच पक्षाचा उमेदवारी अर्ज दिला जाणार आहे.- शहाजीबापू पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
इस्लामपुरातील राष्ट्रवादीत ‘भाऊ’गर्दी
By admin | Published: October 18, 2016 11:15 PM