कोणत्याही शहराची ओळख केवळ दगडमातीच्या इमारती व रस्ते यावरून ठरवता येत नाही. तेथील नागरिक, त्यांच्या परंपरा, संस्कृती, इतिहास या सर्वांच्या मिलाफातून शहर घडत असते. काही विचारवंत, कलाकार आपल्या परंपरेचे, संस्कृतीचे जतन करत असतात. त्यांच्या विचाराने शहराचा विकास होत असतो. आष्टा नगरीचे शिल्पकार माजी आमदार दिवंगत विलासराव शिंदे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कल्पनेतून आष्टा शहराचा सर्वांगीण विकास होत आहे.
आष्टा हे कृषिप्रधान गाव. पूर्वीच्या काळी एका खातेदाराकडे चावडीची बाकी राहिली होती. ही बाकी सुमारे सव्वा लाख रुपये झाली. या खातेदाराने एकाच वेळी सव्वा लाख रुपये बाकी भरली म्हणून गावास सव्वालाखी आष्टा असे म्हटले जाते. आष्टा परिषदेची स्थापना ६ डिसेंबर १८५३ रोजी झाली. जिल्ह्याचे कलेक्टर हे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत गावातील पाच पंच असत. गावाची व्यवस्था कलेक्टर यांच्या हुकुमाने चालत असे. आष्टा पालिकेची पहिली निवडणूक १८८९ मध्ये झाली. १९१७ मध्ये पहिले नगराध्यक्ष म्हणून मूर्ग्याप्पा महाजन यांची निवड झाली. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून बापूसाहेब शिंदे यांची निवड झाली.
१९७४ मध्ये पहिले थेट नगराध्यक्ष काकासाहेब शिंदे तर २००१ दुसरे थेट नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे यांची निवड झाली. पालिकेची इमारत १९६१ मध्ये बांधण्यात आली. आता पालिकेने २००३ मध्ये संत गाडगेबाबा शहर स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. २००६ मध्ये पालिकेची निवडणूक बिनविरोध झाली.
आष्टा पालिका क वर्ग पालिका असूनही पालिकेने शहरात ठिकठिकाणी दुकान गाळे व इतर आर्थिक उत्पन्नाचे नवीन स्रोत उभारून उत्पन्नाचा नवीन मार्ग सुरू केला आहे. आष्टा इस्लामपूर मार्गावर विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल लग्न समारंभ यासाठी नागरिकांना वरदान ठरला आहे. शहरातील रस्ते गटारी यांची कामे झाली असून नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहराला नियमित स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होत आहे.
अद्ययावत भाजी मंडई, मच्छी मार्केट यासह विविध प्रभागातील समाज मंदिरे नागरिकांना उपयोगी ठरत आहेत. राज्यात सर्वाधिक घरकुले आष्टा शहरात उभारण्यात आली आहेत. तसेच महादेवाच्या सात लिंगासह काशिलिंग बिरोबा मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेतून जीर्णोद्धार करण्यात येत आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांमधून निधी मंजूर झाला आहे. कृषी पंढरी असणाऱ्या शहराने ऊस, केळी, हळद, फुले, भाजीपाला या पिकाबरोबर अत्याधुनिक शेतीची कास धरली आहे. बँका, पतसंस्था, सामाजिक, शैक्षणिक, सहकारी संस्थांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. राज्यातील एक आदर्श शहर म्हणून या शहराची वाटचाल सुरू आहे.
- समीर गायकवाड