नेवरी : नेवरी (ता. कडेगाव) परिसरामध्ये शुक्रवारी भिकवडी खुर्द, कोतीज, येतगाव येथे वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. विद्युत महावितरणचे भिकवडी खुर्द येथील सबस्टेशनमधील लघुदाबवाहिनीचे २०, तर उच्च दाबवाहिनीचे १५ विद्युत खांब, १ ट्रान्सफॉर्मर, घरावरील पत्रे, झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. कोतीज येथे नवनाथ पोळ यांच्या पपई पिकाचे वादळी वाऱ्याने अंदाजे १० ते ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. येतगाव (ता. कडेगाव) येथील भैरव शिंगाडे व हरिशचंद्र पोळ यांच्या ढबू पिकाची अंदाजे १५ ते २० लाख रुपयांची हानी झाली आहे. भिकवडी (खुर्द) येथील चंद्रकांत खाशाबा सावंत यांच्या घरावरील पत्रे उडाले. शंकर काशिनाथ ब्राम्हणकर यांचा जनावरांचा गोठा व घरावरील पत्रे उडाले आहेत. वीजपंपाचे ३५ विद्युत खांब जमीनदोस्त झाल्याने नेवरी, भिकवडी, ढाणेवाडी, कोतीज, येतगाव, आंबेगाव, घोटील, खेराडे वांगी, खेराडे विटा, तुपेवाडी (ये), तुपेवाडी आदी गावांमध्ये वीज गायब झाली आहे. गावठाणमधील वीजपुरवठा दोन दिवसात सुरू होईल, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता महावीर शेंडगे यांनी दिली. वादळी वाऱ्याच्या दणक्याने भिकवडी खुर्द, येतगाव, कोतीज या परिसरामध्ये घरांचे, शेतीचे, विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. येरळा काठावर वादळाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. (वार्ताहर) बॉयो अॅग्रो कंपनीला : ८५ लाखांचा फटका नेवरी : वादळी पावसाने शिवणी फाटा (ता. कडेगाव) येथील चंद्रकांत मोरे यांच्या मालकीच्या सी. एम्. बॉयो अॅग्रो कंपनीतील अंदाजे ८५ ते ९० लाखांच्या मालाचे नुकसान झाले आहे. या कंपनीमध्ये विद्युत प्रमुख पॅनेल बोर्ड, स्टार्टर, ५० अश्वशक्तीची विद्युत मोटार पाणी पडून भिजली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे निंबोळी, सरकी, करंजी बी, मका अशा कच्या आणि पक्क्या मालाचे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे प्रमुख शटर तुटून वारे आत शिरल्याने आतील पत्रेही उडून लांब अंतरावर जाऊन पडले. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीखालील तेलाच्या टाकीत गेल्याने संपूर्ण तेल खराब झाले आहे. कच्च्या मालाला आणलेले पॅकिंग बारदान व कागदाचेही नुकसान झाले आहे.
भिकवडी खुर्द, येतगावला वादळाचा तडाखा
By admin | Published: June 05, 2016 12:53 AM