भिलवडी : जिल्हयातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या गाई-म्हैशी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास भिलवडी पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. अशोक नामदेव चौगुले (रा. हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ) असे त्याचे नाव असून, टोळी करून जनावरे विकणारे मोठे रॅकेट असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
भिलवडीचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी पथक तयार करून महेश जोशी (रा. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता, त्याने गुन्हयाची कबुली देत त्याच्याबरोबर अन्य तीन साथीदार असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने ७ ते ८ महिने विविध भागात माहिती गोळा केली.
सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, गडचिरोली नागपूर या भागात राहून त्याने मोठया प्रमाणावर चोरीचे गुन्हे केले आहेत. अंदाजे शंभरांवर जनावरे चोरली असल्याचा प्राथमिक अंदाज भिलवडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. आठ दिवसांपूर्वी तो कोल्हापूर जिल्हयात असल्याची माहिती भिलवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मुडशिंगी (जि. कोल्हापूर) येथे वॉच ठेवून, पाठलाग करून अशोक चौगुले यास ताब्यात घेतले. यावेळी त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे.
नाव व वेश बदलून केली चोरी
अशोक चौगुले सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यातील ग्रामीण भागात नाव व वेश बदलून राहायचा. कधी फळे, भाजीपाला विक्रीचा उद्योग, तर कधी वाहनचालक म्हणून नोकरी करायचा. जनावरे हेरून ती रातोरात गायब करून विकायचा. त्याने नेमकी किती जनावरे लंपास केली, याबाबत विविध पोलीस ठाण्यांतील रेकॉर्ड व नागरिकांच्या तक्रारींची पडताळणी सुरू आहे.
फोटो - जनावरे टोळीतील आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्यासह भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी.