लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: शिराळा येथील स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूईकोट किल्ल्याच्या विकास करणार आहे. त्यादृष्टीने संबंधित विभागास आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी दिली.
भूईकोट किल्ला विकासाबाबत मुंबईत मंत्रालयात गुरुवारी बैठक झाली. या बैठकीस खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अतुल बेनके आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, शिराळा येथील भूईकोट किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला अटक झाल्यानंतर सोडवण्याचा एकमेव प्रयत्न झाला. म्हणून येथे संभाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा, शिल्प, चित्रसृष्टी, स्मारक व किल्ल्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम करताना यातील बांधकाम पूर्णतः शिवकालीन रचणे प्रमाणेच करावे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्तीचा खर्च या प्रकल्पाच्या उत्पन्नामधूनच व्हावा. भिंतीवरील लेसर शोच्या माध्यमातून किंवा अश्याच पद्धतीने संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट दाखविण्यात यावा. संभाजीराजेंचे भव्य वस्तू संग्रहालय करण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण कामे सुरू न करता टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्यात येणार आहे.
आमदार नाईक म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूईकोट किल्ल्यावर शंभूराजांच्या गौरवशाली इतिहासाची नव्या पिढ्यांना माहिती व्हावी. म्हणून आमचे प्रयत्न आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उप-मुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली आहे. सर्वांनी या विकासाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिवसंस्कार सृष्टी स्मारक बनवण्याची खा. डॉ. अमोल कोल्हे व आ. अतुल बेनके यांची संकल्पना आहे. याबाबतीतही यावेळी चर्चा करण्यात आली.