लोकमत न्यूज नेटवर्क.
वाळवा: शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी आणि महिलांच्या हाताला काम देण्यासाठी हुतात्माच्या महालक्ष्मी वाळवा शेतकरी उत्पादन कंपनीची स्थापना केली आहे. यात महिला व बचत गटांना वाव आहे, असे प्रतिपादन संस्थापक प्रवर्तक गौरव नायकवडी यांनी केले.
महालक्ष्मी वाळवा शेतकरी उत्पादन कंपनीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कंपनीच्या बांधकामाचा प्रारंभ व्ही. डी. वाजे आणि कांचन वाजे यांच्या हस्ते भूमिपूजन करून कुदळ मारून झाल्याचे गौरव नायकवडी व स्नेहल नायकवडी यांनी जाहीर केले. नायकवडी म्हणाले, ‘‘कोराेनाची चिंताजनक परिस्थिती व लाॅकडाऊन यामुळे कंपनीच्या कामाला निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत प्रारंभ केला आहे. कंपनीला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. कंपनीत फ्रेश फुड व्यवसाय केला जाईल. द्राक्षे, डाळिंब, मका यांपासून विविध उत्पादने घेतली जातील, तसेच आंबा पल्प, टोमॅटो साॅसचेही उत्पादन होईल. हा बारमाही प्रोजेक्ट आहे. तीन महिन्यांत पैसे मिळवून देणारी फ्रेश फुडसाठी आवश्यक पिके शेतकऱ्यांना घेता येतील.
यावेळी सरपंच डाॅ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर, सरपंच दीपाली शिंदे, सरपंच प्रमिला यादव, पंचायत समिती सदस्य वैशाली जाधव, प्रोजेक्ट प्रमुख स्नेहल नायकवडी, उमेश घोरपडे, मानाजी सापकर, संजय अहिर, डाॅ. राजेंद्र मुळीक, डाॅ. अशोक माळी, संजय खोत, वैभव खोत, भगवान पाटील, नंदू पाटील उपस्थित होते.