लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास सक्त मनाई असताना या नियमांना जाळून दंडात्मक कारवाईचे अधिकार असणाऱ्या प्रशासनाच्या तोंडावर धूर सोडण्याचे धाडस सर्रास केले जात आहे. धुम्रपान करणाऱ्यांना ना कारवाईची भीती आहे, ना दुसऱ्याच्या आरोग्याची काळजी. त्यामुळे सांगलीच्या बसस्थानकासह शहरातील चौकाचौकात, रस्त्यांवर आरोग्याच्या प्रश्नांचे धूर हवेत सोडले जात आहेत.
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात आणि व्यापार अधिनियम, वाणिज्य उत्पादन, पुरवठा व वितरण प्रतिबंध कायदा) अधिनियम २००३ हा केंद्र सरकारचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. असाा गुन्हा केल्यास दोनशे रुपये दंड केला जातो.
अशाप्रकारच्या कारवाईचे अधिकार मुख्यत्वे अन्न व औषध प्रशासनाला आहेत. त्याचबरोबर पोलीसांसह सर्व शासकीय संस्थांचे प्रमुख, व्यवस्थापक, आस्थापनांचे व्यवस्थापक अशा अनेकांना कारवाईचे अधिकार दिले आहेत. तरीही कुठेही कारवाई होत नसल्याने बेफिकीरीचे धूर सर्वत्र सोडले जात आहेत. बसस्थानकावर तर सर्रास धुम्रपान केले जाते. स्थानकात, कॅन्टिनमध्ये, चहाच्या टपऱ्यांवर, दुकानांच्या बाहेर, शासकीय कार्यालयांच्या आवारात धुम्रपान केले जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने कधीही याप्रश्नी धडक मोहिम राबविली नाही. त्यामुळे कारवाईची भीती अशा लोकांमध्ये उरलेली नाही. अन्य आस्थापनांवर जबाबदारी दिल्यानंतर हे प्रशासन नामानिराळे झाले आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘अन्न, औषध’ला
दंडाचे अधिकार प्राप्त
राज्यात अनेक ठिकाणी अन्न व औषध प्रशासनामार्फत याप्रश्नी कारवाई होत असताना सांगली जिल्ह्यात या प्रश्नाकडे कानाडोळा केला जात आहे. तंबाखू, तंबाखूजन्य साठा शोधणे, अशा साठेबाजांवर कारवाई करणारा हा विभाग याच तुंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करुन सार्वजनिक आरोग्य बिघडविण्याच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करीत आहे.
बिडी-सिगारेट
ओढल्याचे धोके
तंबाखूच्या धुरात कार्बन मोनोऑक्साईड, टोल्युन, अमोनिया, आर्सेनिक, कॅडमिअम, हायड्रोजन सायनाईड अशी घातक रसायने असतात. बिडी, सिगारेटमुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा, किंवा मूत्राशयाचा कर्करोग होतो. न पिणाऱ्यांनाही या धुराने धोका आहे.