सदानंद औंधे मिरज : वैद्यकीय नगरी अशी ख्याती असलेल्या मिरजेत महापालिकेचे वैद्यकीय कचरा निर्मूलन सयंत्र बंद असल्याने वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. वैद्यकीय कचरा नष्ट करण्याचे काम ठेकेदाराकडे सोपवून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. कचरा कोंडाळ्यात वैद्यकीय कचरा जाळण्याचे प्रकार सुरू आहेत.मिरजेत सुमारे दोनशे खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. बेडग रस्त्यावर महापालिकेच्या कचरा डेपोजवळ वैद्यकीय कचरा जाळण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीअभावी गेली दोन वर्षे मिरजेतील वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प बंद आहे.
वैद्यकीय कचरा निर्मूलन सयंत्र चालविण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली होती. मात्र याबाबतच्या तक्रारीमुळे वैद्यकीय कचरा विल्हेवाटीची जबाबदारी इंडियन मेडिकल असोसिएशनकडे सोपविण्यात आली. मात्र वैद्यकीय कचरा निर्मूलन यंत्रणा बंद असल्याने मिरजेतील रुग्णालयांतील वैद्यकीय कचरा खासगी ठेकेदाराकडे देण्यात येतो.
महापालिका आरोग्य विभागाने वर्षभरापूर्वी मोहीम राबवून शहरातील अनेक रूग्णालय चालकांना २५ हजार ते लाखापर्यंत दंड केला आहे. मात्र रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची समस्या कायम आहे. दाट लोकवस्तीत व गल्ली-बोळात कंटेनरमध्ये टाकलेला वैद्यकीय कचरा आजुबाजूला पसरत आहे. यामुळे अस्वच्छता व मोकाट कुत्र्यांच्याही उपद्रवामुळे नागरिक हैराण आहेत.