सांगली : महापालिकेतील महापौर, उपमहापौर पदांच्या निवडीचा कार्यक्रम ७ फेब्रुवारीस जाहीर झाल्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी सांगलीत पार पडली. इच्छुकांसह भाजप नगरसेवकांशी चर्चा करून कोअर कमिटीच्या नेत्यांनी, गटबाजी होऊ नये म्हणून रणनीती आखण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात सायंकाळी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीस खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, नीता केळकर, महापालिकेचे गटनेते युवराज बावडेकर आदी उपस्थित होते.
बैठकीस भाजपच्या सर्व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. यामधील इच्छुक असलेल्या सदस्यांशी चर्चा करण्यात आली. इच्छुकांमध्ये उर्मिला बेलवलकर, सविता मदने, गीता सुतार, नसिमा नाईक, कल्पना कोळेकर, अनारकली कुरणे, लक्ष्मी सरगर यांचा समावेश आहे. उपमहापौर पदासाठी राजेंद्र कुंभार, आनंदा देवमाने, प्रकाश ढंग, जगन्नाथ ठोकळे इच्छुक आहेत. इच्छुकांच्या नावांची नोंद घेतानाच प्रमुख सदस्यांची मतेही अजमावण्यात आली.महापौर व उपमहापौर पदांसाठी पक्षामार्फत सर्व नावे प्रदेश कार्यकारिणीला पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. १ फेब्रुवारीस माजी मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगलीत येणार असल्याने तेसुद्धा इच्छुकांसह नगरसेवकांशी संवाद साधणार असून त्यानंतर प्रदेश कार्यकारिणीकडे नावे जाणार आहेत. सदस्यांनी नावे निश्चित होत असताना नाराजी व्यक्त करू नये. सत्तेत असल्यामुळे भविष्यात प्रत्येकाला पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे कुणीही पक्षविरोधी कारवाई करण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचनाही देण्यात आली.