सांगली : महापौर व उपमहापौर निवडीत घोडेबाजार करणाऱ्या पक्षांचे नेते महापालिकेत येत आहे. निवडणुकीत घृणास्पद प्रकार करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांचे कसे स्वागत करायचे? असा सवाल करीत मंगळवारी महापालिकेत आयोजित आढावा बैठकीवर भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी बहिष्कार टाकणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर व सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी सांगितले.
फेब्रुवारीत झालेल्या महापौर, उपमहापौर निवडीत भाजपचे सात नगरसेवक फोडून काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेतील सत्ता उलथवून टाकली होती. या निवडणुकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला होता. त्यानंतर मंगळवारी ते प्रथमच महापालिकेत येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने मात्र या बैठकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी तसा निरोपही धाडण्यात आला आहे.
याबाबत शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर म्हणाले की, महापौर, उपमहापौर निवडीत एका पक्षाने घोडेबाजार केला. हा सारा प्रकार घृणास्पद होता. त्या पक्षाच्या नेत्याचे शाही स्वागत होत आहे. पण, आम्ही त्या पक्षाचा व नेत्याचा निषेध करण्यासाठी बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात १०० कोटी वसुलीचे प्रकरण गाजत आहे. त्याच पक्षाचे ते प्रदेशाध्यक्षही आहेत. घोडेबाजार करण्यासाठी पैसा कोठून येतो, हे जनतेला समजून आले असावे, असा टोलाही त्यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता लगाविला.