श्रीनिवास नागे ।सांगली : जिल्ह्यातील भाजपचे ‘फायरब्रँड’ नेते अर्थात खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख हे दोघंही एकमेकांना ‘चेकमेट’ करण्यासाठी चाली रचण्यात मग्न आहेत. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये असली तरी बुद्धिबळाच्या पटावर आतापासून विलक्षण हालचाली सुरू आहेत.
काँग्रेस-राष्टÑवादी असा प्रवास करून आलेल्या संजयकाकांनी टायमिंग साधत भाजपमध्ये उडीघेऊन खासदारकी मिळवली. मात्र, पृथ्वीराजबाबांना जिल्हाध्यक्षपदावर समाधान मानावं लागलं. दोघंही दोन ‘हेवीवेट’ नेत्यांच्या (आर. आर. पाटील व पतंगराव कदम) राजकारणाखाली दबलेले. त्यामुळं सुप्त महत्त्वाकांक्षे-खाली दडलेल्या विस्तवाला भाजपनं वारं दिलं; पण नंतर हे दोघंच एकमेकांविरोधात उभं ठाकल्याचं भाजपच्या लक्षातही आलं नाही... आणि भाजपचीही काँग्रेस-राष्टÑवादी झाली!
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मालकीवरून काका व बाबा यांच्यातल्या वादाची ठिणगी पहिल्यांदा पडली. ‘वालचंद’मधल्या दोन्ही गटांनी या दोघांना आपापल्या बाजूनं उभं केलं. तिथं मागच्या दारानं घुसलेल्या बाबांचा डाव काकांनी मोडून काढला. बाबांनी काकांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरूनही दोघांत कुरघोड्या झाल्या.
बाबांनी चुलतबंधू संग्रामसिंहांचं नाव पुढं केलं, तर काकांनी शिवाजी डोंगरेंचं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेत बाबांनी ‘वालचंद’चे उट्टे काढले आणि भावाला अध्यक्ष केलं.पतंगराव कदम गटाशी उभा दावा असतानाही शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या जुन्या समीकरणातून काका आणि कदम गटाचा ‘अंडरस्टँडिंग’चा नवा अध्याय सुरू झाला. त्यातूनच पतंगराव कदमांचे ज्येष्ठ बंधू मोहनशेठ यांना विधानपरिषद निवडणुकीवेळी काकांनी मदत म्हणून जिल्हा परिषद आणि तासगाव नगरपालिकेतलीमतं दिली. पुढे पतंगराव आणिकाका एकाच व्यासपीठावर दिसू लागले.