सांगली : जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी राष्टÑवादी, काँग्रेस आघाडी आणि सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपच्या सदस्यांपाठोपाठ आता आघाडीचे २२ सदस्य हैदराबादच्या सहलीवर गेले आहेत. भाजपच्या सहलीत एकूण २४ सदस्य असून संजयकाका गटाचे चार सदस्य जिल्ह्यातच आहेत. त्यामुळे संख्याबळाचे गणित अद्याप स्पष्ट नसल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी अर्थमंत्री व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड दि. २ जानेवारी रोजी होणार असून, यावेळी मतदान करणाºया सदस्यांची संख्या ५९ आहे. यापैकी भाजपच्या चिन्हावर आलेले २४ सदस्य गोव्याच्या सहलीवर आहेत. रविवारी ते तिथून चेन्नईला जाणार असल्याचे समजते. भाजपचे खासदार संजयकाका पाटील समर्थक डी. के. काका पाटील, नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर आणि जि. प.चे उपाध्यक्षपदाचे दावेदार शिवाजी डोंगरे हे चार सदस्य सहलीस गेले नसले तरी, ते भाजपसोबतच राहणार असल्याचा विश्वास भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्याचबरोबर ब्रह्मदेव पडळकर, प्रमोद शेंडगे हे दोन अपक्ष सदस्य भाजपकडे आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा पार करता येईल, असा भाजपला विश्वास वाटतो.
दुसरीकडे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार गटासह शिवसेनेचे तीन व अजितराव घोरपडे गटाचे दोन सदस्य आघाडीकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. रविवारी आघाडीचे २२ सदस्य सहलीवर गेले आहेत. शिवसेना व घोरपडे गटाची बेरीज करून खासदार गटाला खेचल्यास सत्तेचे गणित जमेल, असा विश्वास जयंत पाटील यांना वाटतो.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे १४ अधिक १ असे १५ सदस्य आहेत. पण, शनिवारी इस्लामपुरात झालेल्या बैठकीला एक सदस्य गैरहजर राहिल्यामुळे उलट-सुलट चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे भगवान वाघमारे हे भाजपच्या सहलीमध्ये गेल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे राष्टÑवादी नेत्यांनी सदस्यांना व्हिप बजावला आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादीचे एकूण २२ सदस्य सहलीला गेल्याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी दिली.
संख्याबळाचे गणित आघाडीला जमणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील महाविकास आघाडी आता जिल्हा परिषदेत साकारणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तेचे राजकारण तापले असून सदस्यांच्या खेचाखेचीत नेते गुंतले आहेत.