शीतल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख सत्तास्थान असलेल्या महापालिकेवर यंदा भाजपनेही स्वबळावर झेंडा फडकविण्याची तयारी चालविली आहे. राज्यातील भाजप सरकारची ताकद, मंत्र्यांची फौज, दोन्ही आमदारांची प्रतिमा या जोरावर भाजप पहिल्यांदाच महापालिकेच्या सत्तेचा दावेदार बनला असला तरी, पक्षाकडे निवडणूक जिंकणाºया सक्षम उमेदवारांची वानवा दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘इनकमिंग’वर भाजपचा डोळा आहे.जिल्ह्यात भाजपने बहुतांश सत्तास्थानांवर कब्जा केला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील यशानंतर जिल्हा परिषद व नगरपालिका, नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व कायम राखले आहे. त्याला केवळ सांगली महापालिका अपवाद राहिली आहे. महापालिकेत प्रत्येक वेळी भाजपचा चंचुप्रवेश झाला आहे. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यश भाजपला मिळाले आहे. गत निवडणुकीत भाजपने तत्कालीन आमदार संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली होती. पण गेल्या चार वर्षात जिल्ह्याचे राजकारण बरेचसे बदलले आहे.महापालिका क्षेत्रात सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे आमदार आहेत. गत निवडणुकीपेक्षा फरक इतकाच आहे की, यंदा पवारांच्या जागी गाडगीळ आमदार आहेत. पण गेल्या काही वर्षात महापालिका हद्दीत भाजपची ताकद वाढली आहे. पक्षात नव्याने कार्यकर्ते दाखल झाले आहेत. त्यातून दोन्ही आमदारांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकास कामांचा धडाका लावला आहे. सुधीर गाडगीळ यांनी तर शासनाकडून ३३ कोटी रुपयांचा विशेष निधी मिळविला आहे. त्यातून गल्लीबोळातील रस्ते डांबरी होऊ लागले आहेत. त्यात गाडगीळांची स्वच्छ प्रतिमा, जनसंपर्क या बाबीही भाजपला सांगली व कुपवाडमध्ये लाभदायक ठरणार आहेत. मिरजेत सुरेश खाडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यात केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. महसूलमंत्र्यांपासून ते कृषी राज्यमंत्र्यांपर्यंत साºयांचीच फौज पक्षाच्या पाठीशी आहे.निवडणुका जिंकण्यासाठी निवडून येणारा उमेदवार, हा महत्त्वाचा निकष ठरतो. त्यात मात्र भाजपची काहीअंशी पीछेहाट दिसून येते. कार्यकर्त्यांचे जाळे प्रभागात असले तरी, सक्षम उमेदवारांची वानवा असल्याचे जाणवते. भाजपमधील काही जणांनी तर दोन वर्षापासून वॉर्डात तयारी चालविली आहे. पण त्यांना कितपत जनाधार मिळेल, याविषयी त्यांच्याच पक्षाचे नेते साशंक आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजांवर भाजपची नजर राहणार आहे.सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीमधील काही नगरसेवक, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. अनेकजण भाजपच्या कार्यक्रमात दिसू लागले आहेत. त्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यास उमेदवारीचा प्रश्न बिकट बनणार आहे. त्यातून नाराज झालेल्यांना भाजपचे दरवाजे खुले असतील. त्यातून नवा-जुना वाद होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.राष्ट्रवादी काँग्रेस : वजा भाजपमहापालिका क्षेत्रात भाजपची ताकद किती? यावर राजकीय तज्ज्ञांत मत-मतांतरे दिसून येतात. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीशी राष्ट्रवादीची ताकद होती. सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीने भाजपला छुपा पाठिंबा दिला होता. सांगलीतून आमदार गाडगीळ हे १४ हजाराच्या मतांनी विजयी झाले. यात राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे; तर मिरजेत सुरेश खाडे यांचे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी सलगी आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळावर अथवा काँग्रेससोबत आघाडी करून लढण्याचा निर्णय घेतल्यास भाजपची ताकद किती राहणार, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. पण गेल्या तीन वर्षात आ. गाडगीळ यांनी भाजपचे बळ वाढविण्याचा निश्चितच प्रयत्न केला आहे. त्यामुळे सांगली, कुपवाडमध्ये गाडगीळ यांची खरी कसोटी लागणार आहे.खाडेंची कोंडीमिरज विधानसभा मतदारसंघात सुरेश खाडे सलग दुसºयांदा विजयी झाले आहेत. पण त्यांनी यापूर्वी कधी महापालिकेच्या निवडणुकीत फारसा रस दाखविलेला नाही. कारण विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना सर्वपक्षीय नगरसेवकांची मदत झाली आहे. पक्ष, गटतट विसरून खाडे काम करतात. यंदा मात्र आ. खाडे यांना भाजपसाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारी चालविली आहे. त्यामुळे खाडे यांची खºयाअर्थाने कोंडी होणार आहे. त्यामुळे ते विधानसभेचे गणित घालणार, की महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करणार, याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.विद्यमान नगरसेवकांना गळकाँग्रेस-राष्ट्रवादीतील काही विद्यमान नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे, तर काहीजण संपर्कात असल्याचे बोलले जाते. भाजपने स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीलाच प्रवेश द्यावा, असा मतप्रवाहही आहे. मिरजेतील सुरेश आवटी व त्यांच्या समर्थकांवर भाजपची नजर आहे. त्याशिवाय मिरजेतील आणखी काहीजणही भाजपकडून इच्छुक आहेत. पण त्यांना पक्षात घेण्यास विरोध आहे. सांगलीतील विद्यमान नगरसेवकही भाजपच्या कार्यक्रमातून दिसू लागले आहेत. नगरसेवकांना पक्षात आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत झाली आहे.
नाराज नगरसेवकांवर भाजपचा डोळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:23 AM