लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरजेतील ॲपेक्स कोविड रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी सोमवारी भाजपच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी तिरडीसह भाजपचे नगरसेवक महासभेत घुसले. पोलिसांनी सदस्यांना सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला.
भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, गजानन मगदूम, संजय यमगर, गजानन आलदर, संघटन सरचिटणीस दीपक माने, अश्रफ वांकर, प्रियानंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महासभा सुरू असताना प्रवेशद्वारात ठिय्या मारला. यावेळी अधिकाऱ्यांच्या चौकशी करावी, अशी घोषणाबाजी करण्यात आली. भाजपचे नगरसेवक तिरडी घेऊन महासभेत घुसले. ॲपेक्सप्रकरणी महापौरांनी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी लावून धरली. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी हस्तक्षेप करत सदस्यांना सभागृहाबाहेर काढले.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ॲपेक्स कोविड रुग्णालयात ८७ रुग्णांचा बळी गेला. त्यानंतर रुग्णालयाचे प्रमुख डाॅ. महेश जाधव याच्यासह अनेकांना अटकही झाली. पहिल्या लाटेत या रुग्णालयाबाबत नातेवाईक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारी असतानाही महापालिकेने दुसऱ्या लाटेत कोणतीही सत्यता न पडताळता परवानगी दिली. ही गंभीर चूक आहे. महापौरांसह नगरसेवकांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. महापौरांनी खुलासा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
चौकट
सदस्यांना वस्तुनिष्ठ माहिती द्या : महापौर
दरम्यान, सभेतही ॲपेक्सप्रकरणी चौकशीचे आदेश द्यावेत, असा आग्रह भाजपने धरला होता. हा विषय गंभीर आहे. प्रशासनाने ॲपेक्सप्रकरणी सदस्यांना वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, असे आदेश महापौर सूर्यवंशी यांनी दिले.