कडेगाव : कडेगाव शहरात नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान होत आहेत. भाजपचे नगरसेवक नितीन शिंदे यांच्यासह आठ कार्यकर्त्यांनी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
कडेगाव येथे नगरसेवक नितीन शिंदे यांच्यासह महेश शिंदे, श्रीमंत शिंदे, शंकर शिंदे, संदीप शिंदे, राजेंद्र शिंदे, सचिन शिंदे, धनाजी शिंदे या प्रमुख कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. नगरसेवक नितीन शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते नगरसेवक नितीन शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जितेश कदम, सुरेशचंद्र थोरात उपस्थित होते.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, नगरसेवक नितीन शिंदे हे काँग्रेसच्या विचारांचे होते. परंतु, काही कारणाने ते काँग्रेसपासून दुरावले होते. त्यांचे वडील ए. के. शिंदे हे डॉ. पतंगराव कदम यांचे निकटवर्तीय होते. नितीन यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ही समाधानाची बाब आहे. त्यांच्या प्रभागातील सर्व विकासकामे आपण मार्गी लावू.
नितीन शिंदे म्हणाले, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यापुढे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे काम करणार आहे.
यावेळी सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव, माजी नगराध्यक्ष संगीता राऊत, नगरसेवक राजू जाधव, सागर सूर्यवंशी, शशिकांत रास्कर, अनिल जरग, रघुनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.
फोटो : ०६ कडेगाव १
ओळ : कडेगाव येथे नगरसेवक नितीन शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र थोरात, सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले उपस्थित हाेते.