सांगली : महापालिका स्थायी समिती सभपती पदी भाजपचे धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संतोष पाटील यांचा ९ विरुद्ध ५ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका पवित्रा केरीपाळे व संगीता हारगे गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीत फुट पडल्याचे स्पष्ट झाले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा दणका बसला. महापालिका स्थायी समिती सभापती निवडीसाठी बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विशेष सभा झाली. स्थायी समितीत भाजपचे ९, काँग्रेसचे ४ तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. राष्ट्रवादीने या निवडणूकीत काँग्रेसला पाठींबा दिला होता. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचे संख्याबळ ७ वर होते. भाजपच्यावतीने धीरज सूर्यवंशी तर काँग्रेसच्या वतीने संतोष पाटील व फिरोज पठाण यांनी उमेदवार अर्ज भरले होते. पठाण यांनी अर्ज मागे घेतल्याने सूर्यवंशी व पाटील यांच्यात थेट लढत झाली. सुर्यवंशी यांना ९ तर पाटील यांना ५ मते मिळाली.
काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता मिळवली,पण..राष्ट्रवादीच्या तीन पैकी दोन नगरसेवक फुटल्याचे स्पष्ट झाले. पवित्रा केरीपाळे व संगीता हारगे यांनी निवडणूकीकडे पाठ फिरवली. राष्ट्रवादीतील ही फूट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे. वर्षभरापुर्वीच महापौर, उपमहापौर निवडीत काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपचे सहा नगरसेवक फोडून सत्ता मिळवली. पण स्थायी समितीवर भाजपला शह देण्यात पुन्हा एकदा आघाडीला अपयश आले.
सूर्यवंशी समर्थकांचा जल्लोषसभापती पदी निवडीनंतर धीरज सूर्यवंशी यांचा जितेंद्र डुडी, आयुक्त सुनिल पवार यांच्यासह आ. सुधीर गाडगीळ, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, गटनेते विनायक सिंहासने, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी नगरसेवक सुरेश आवटी यांच्यासह भाजपच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. सूर्यवंशी यांच्या समर्थकांनी महापालिकेसमोर फटाक्यांच्या आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. यावेळी सूर्यवंशी यांच्यासह भाजप नेत्यांची शहरातून मिरवणूक काढली.