सांगली : काँग्रेसच्या काळात एकही योजना पूर्णत्वास गेली नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८० हून अधिक योजना आखल्या. देशाची दिशाच बदलली आहे. पंधरा वर्षात जो बदल काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात करता आला नाही, तो बदल देवेंद्र फडणवीस सरकारने केला. नवभारत निर्मितीच्या संकल्पनेत नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.सांगली विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ भाजपच्या प्रज्ञा सेलच्यावतीने महाजनादेश, महाचर्चा या संवाद कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. यावेळी महापौर संगीता खोत, प्रज्ञा सेलचे प्रदेशाध्यक्ष शिरीष देशपांडे, विधानसभा प्रभारी दीपक शिंदे-म्हैसाळकर, संजय परमणे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, सतीश मालू उपस्थित होते.डॉ. सावंत म्हणाले, भाजपचे सरकार अंत्योदय तत्त्वावर चालणारे आहे. पंतप्रधान मोदी यांनी शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना आखल्या. जनधन, सुकन्या, उज्ज्वला, आयुष्यमान अशा अनेक योजनेतून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावले. याउलट काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले.
महाराष्ट्रातही त्यांची सत्ता होती. केवळ स्वार्थासाठी त्यांचा कारभार सुरू होता. एकही योजना अंमलात आणली नाही. पंधरा वर्षात जो बदल काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात करता आला नाही, तो बदल फडणवीस सरकारने केला. विरोधकांना आरोप करण्यासाठी एकही मुद्दा नाही. सांगलीत आ. गाडगीळ यांनी कोट्यवधीची कामे केली आहेत. समाजातील प्रोफेशनल्समध्ये काम करणाऱ्या घटकांनी या बदलत्या राजकारणात सहभागी व्हावे, असे आवाहनही सावंत यांनी केले.यावेळी उद्योजक सतीश मालू, डॉ. भारती शिंदे यांचीही भाषणे झाली. संजय परमणे यांनी स्वागत केले. डॉ. रणजित जाधव, विजय पाटील, प्रमोद शिंदे, शैलेश पवार, बी. बी. सुल्ह्यान, विनायक शेटे, एस. एल. पाटील, अॅड. समीर पटवर्धन, सुनील माणकापुरे, डॉ. सुषमा पाटील आदी उपस्थित होते.