वाळवा : पलूस तालुक्यातील नागठाणे गावची निवडणूक अटीतटीची होणार आहे. येथे १५ जागा असून त्यातील वाॅर्ड क्रमांक २ मध्ये भाजपने दोन पावले माघारी घेतल्याने सर्वसाधारण महिलांच्या दोन्ही जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. येथे वृषाली पाटील, दीपाली माने यांची निवड झाली आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी काट्याची लढत रंगणार आहे.
गत निवडणुकीनंतर काँग्रेसच सत्तेत आली होती.
वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये तीन जागांसाठी दहा उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये एका जागेसाठी निवडणूक होत असून इथे काँग्रेस विरुद्ध भाजप सरळ लढत आहे. तसेच तीन क्रमांकाचा वाॅर्ड सोडून सर्व वाॅर्डांत सुद्धा सरळ लढत आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, पलूस तालुका समन्वय समितीचे महेंद्र लाड, आमदार अरुण लाड, हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव नायकवडी, गौरव नायकवडी यांचा गट एकत्र आहे. यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, तालुकाध्यक्ष विजय पाटील, पंचायत समिती माजी सभापती मांगलेकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष जयवंत मदने, जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांची ताकद पणाला लागणार आहे.