लोकमत न्यूज नेटवर्क
जत : भारत हा कृषिप्रधान देश आहे, असे आपण म्हणत असलो तरी शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचे काम प्रतप्रधान नरेंद्र मोदी सरकार करत आहे. देशात मागील सात वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. परंतु, सतत शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र शासन निर्णय घेत आहे, असा आरोप आमदार विक्रम सावंत यांनी केला.
जत येथील श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार परिसरात केंद्र सरकारने कृषी कायदे पाठीमागे घ्यावेत व भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी जत तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने लाक्षणिक आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
आमदार विक्रम सावंत म्हणाले की, डिझेल, पेट्रोल व शेतीमालाला हमीभाव याचे भांडवल करून केंद्र सरकारने देशात सत्ता मिळवली आहे. परंतु, आता पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार महागाईविरोधात बोलण्यास तयार नाही. टोलवसुली व जीएसटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वसुली सुरु आहे. परंतु, विकास होताना दिसत नाही. कृषी कायद्यांविरोधात जत तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन जनजागृती करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आप्पाराया बिराजदार, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, बाबासाहेब कोडग, सुजय शिंदे, मोहन माने-पाटील, तुकाराम माळी, इराण्णा निडोणी यांनीही मनोगत व्यक्त केले. विकास माने, नगरसेवक साहेबराव कोळी, आकाश बनसोडे, इराण्णा निडोनी, महादेव कोळी, ॲड. युवराज निकम, अशोक बन्नेनवार, नीलेश बामणे, मारुती पवार, संतोष भोसले आदी उपस्थित होते.