सांगली /विटा ,दि. ९ : नोटाबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे पेकाटच मोडले आहे. तरीही काहीजण नोटाबंदीचे समर्थन करीत आहेत. ते भाजपचे हस्तक असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.
नोटाबंदी वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आकडेवारीसह हा निर्णय चुकल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, नोटाबंदीनंतर काहीजण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तेव्हा अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी ४ ते ५ लाख कोटी काळा पैसा नष्ट करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.
प्रत्यक्षात ९९ टक्के नोटा बँकेत जमा झाल्या. १ हजार ३ कोटी बेकायदा रक्कम जप्त केली, तर १७ हजार ५२६ कोटी अघोषित उत्पन्न उघड केले. त्याची बेरीज केली, तर एकूण अर्थव्यवस्थेच्या दोन टक्केही काळा पैसा उघड झालेला नाही. याउलट नोटाबंदी न करताही २०१२ ते २०१४ या दोन वर्षात अनुक्रमे १९ हजार ३३७ व ९० हजार ३९१ कोटीची अघोषित रक्कम उघड झाली होती. हे आकडे कॅगच्या अहवालातील असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
नोटाबंदी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले एकही उद्दिष्ट साध्य झालेले नाही. नोटाबंदीने असंघटित क्षेत्राचे पेकाट मोडले आहे. पहिल्या तीन महिन्यातच १५ लाख लोकांचे रोजगार बुडाले. कधी नव्हे इतकी मंदीची लाट देशात आली. नोटाबंदीनंतर जीएसटीच्या जाचक अटीने व्यापारीवर्ग त्रस्त झाला. एकही भूल कमल का फूल असे व्यापाऱ्यांनी बिलावर छापले. नोटाबंदीला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविण्यात आले. या काळात १५० लोकांचा मृत्यू झाला.
आजही समाजातील विविध घटकांवर सरकारची दहशत आहे. नोटाबंदी, जीएसटीविरोधात वक्तव्ये करू दिली जात नाही. आता नोटाबंदी कशी चांगली होती, हे सांगण्यासाठी भाजपने काही हस्तक शोधले आहेत.
देश, विदेशातील हे हस्तक नोटाबंदीचे समर्थन करीत फिरत आहेत. पण सांगलीतील एखाद्या व्यापाऱ्याला विचारले तरी, नोटाबंदीचा काय परिणाम झाला, हे कळून येईल. त्यामुळेच राष्ट्रवादीने पंतप्रधानांना खेळण्यातील नोटा पाठविण्याचा निर्णय घेतला असून यापुढे देशाच्या अर्थव्यवस्थेशी असा खेळ करू नका, खेळ खेळायचा असेल तर या खेळण्यातील नोटांशी खेळा, असा संदेशही त्यांना द्यायचा आहे, असा टोलाही पाटील यांनी लगाविला.