दिलीप मोहितेविटा : जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी खानापूर तालुका सोसायटी गटातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपला उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे साहजिकच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीला बिनविरोधची संधी मिळाली. या गटातून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर खानापूर सोसायटी गटात कार्यकर्त्यांनी दुसऱ्यांदा जल्लोष केला.
जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी खानापूर सोसायटी गटातून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसमधून सोसायटी व पतसंस्था गटातून माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व महिला गटातून सुरेखा मुळीक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, भाजपला एकही उमेदवार मिळाला नाही. जिल्हा बॅँकेसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी झाली. त्यामुळे सोसायटी व पतसंस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी नेते पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज काढून घेतला. त्यामुळे शिवसेनेचे अनिल बाबर सोसायटी गटातून बिनविरोध निवडून आले. त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात आली.
जिल्हा बॅंकेच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशीच शिवसेनेचे आमदार अनिल बाबर बिनविरोध विजयी झाल्याने त्यावेळी तालुक्यात समर्थक कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला होता. त्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार बाबर यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतरही मंगळवारी पुन्हा खानापूर तालुक्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.