सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात पंजाब सरकारने सुरक्षेत त्रुटी ठेवून त्यांचा जीव धोक्यात आणल्याची टीका करीत भाजपने बुधवारी सांगलीत मानवी साखळी आंदोलन केले. पंजाब सरकारचा निषेधही नोंदविण्यात आला.सांगलीच्या राम मंदिर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी पंजाब सरकारच्या निषेधाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. निवेदनात भाजपने म्हटले आहे की, नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यावर असताना पंजाबमधील काँग्रेस सरकारने त्यांच्या सुरक्षेत त्रुटी ठेवून कट-कारस्थान रचून त्यांचे प्राण धोक्यात आणले होते; परंतु देशातील सक्षम संरक्षण यंत्रणेच्या तत्परतेने मोदी या संकटातून बचावले.पंजाबमधील काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक केलेल्या या कारस्थानाचा निषेध करीत आहोत. जर भविष्यात काही अपरिहार्य घडले तर पंजाब शासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.आंदोलनात ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय सदस्य संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, जयगोंडा कोरे, प्रकाश बिरजे, विनायक सिँहासने, सुब्राव मद्रासी, भारती दिगडे, ऊर्मिला बेलवलकर, ज्योती कांबळे, स्मिता पवार, आदी उपस्थित हाेते.
पंजाब सरकारविरोधात सांगलीत भाजपचे मानवी साखळी आंदोलन, नोंदवला जाहीर निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 7:07 PM