आष्टा : आमच्या आघाडी शासनाने रोजगार हमी योजनेसारख्या योजनांतून राज्यातील पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणात केले़ मात्र भाजप युती शासनाने या योजनेकडे दुर्लक्ष केलेले आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठा योजनांना पैसे देताना शासन दुजाभाव करीत असून, विदर्भासाठी निधी देताना शासन जसा हात ढिला सोडते, निधींची खैरात करते, तसा राज्याच्या इतर भागात निधी देताना सोडत नाही, असा आरोप माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केला.मिरजवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने दलित वस्ती सुधार योजनेतून रस्ता काँक्रिटीकरण, चौदाव्या वित्त आयोगातून नरसोबा मंदिर व साळुंखे गल्लीत पेव्हिंग ब्लॉक व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून खोत मळा ते चव्हाण मळा रस्ता मुरुमीकरण आदी कामे केली आहेत. या विकास कामांचे आ़ पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील, माजी सभापती सौ़ पपाली कचरे, उपसभापती सौ़ भाग्यश्री शिंदे, माजी उपसभापती वैभव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.आ़ पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोटाबंदीच्या गोंधळाचा अंदाज आलेला नाही़. सामान्य माणसांचे हाल सुरू आहेत़ तरीही ते देशाला पन्नासाव्या दिवशी जोरात भाषण देतील़ ते प्रभावी वक्ते आहेत. काँग्रेस पक्षानेही आता त्यांच्या तोडीस तोड प्रभावी वक्ता पुढे आणायला हवा़ देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केली. मग काळा पैसा बाहेर आला का? जिल्हा मध्यवर्ती बँकांना नोटा बदलण्यास बंदी करून शासनाने ग्रामीण भाग व शेतकऱ्यांवर अविश्वासच व्यक्त केलेला आहे़ सामान्य माणसांच्या प्रश्नांवर संघर्ष उभा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवा.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा़ आपल्याकडे आता वेगवेगळे पुढारी येतील, मोठमोठ्या घोषणा करतील़ पण त्यांना फसू नका, असे आवाहनही आ. पाटील यांनी केले.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शामराव साळुंखे यांनी, आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातूनच गावाचा, भागाचा विकास झाल्याचे सांगून, त्यांना साथ देण्याचे आवाहन केले. माजी जि़ प़ सदस्य संभाजी कचरे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, महिला तालुकाध्यक्षा सौ़ सुस्मिता जाधव, राजारामबापू बँकेचे संचालक अनिल गायकवाड, पंडित नांगरे, यशवंत गायकवाड, वसंतराव सावंत, विलासराव पाटील, काशिनाथ खोत, पोलिसपाटील हरिदास पाटील, विष्णू सावंत, सुरेंद्र साळुंखे, हरी खिलारे यावेळी उपस्थित होते़ सरपंच सौ. जयश्री हंकारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले़ निशिकांत पाटील यांनी आभार मानले़ दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)नोटाबंदीच्या समर्थनार्थ : सरकारकडून उदोउदो सध्या समाजात नोटाबंदीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले असले तरी या नोटाबंदीचा का डांगोरा फिटण्यात येत आहे हेच सामान्य नागरिकांना समजत नाही. याचा फ ायदा उद्योजकांना झाला असून सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. तरीही सरकार नोटाबंदीचा उदोउदो करत आहे. हे लोकशाहीमध्ये धोक्याचे होत असून याचा परिणाम सामान्य जीवनावर विपरित होत आहे. याबाबत सामान्य माणसांचा आवाजही दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे,.
भाजपकडून योजनांकडे दुर्लक्ष
By admin | Published: December 30, 2016 11:58 PM