भाजपचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणणार - विश्वजीत कदम
By अशोक डोंबाळे | Published: September 7, 2023 06:00 PM2023-09-07T18:00:25+5:302023-09-07T18:01:29+5:30
तालुक्यात जाऊन लोकांशी संवाद साधणार
सांगली : भाजपचा नाकर्तेपणा भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकांसमोर आणला. आता आम्ही भाजपचा हाच नाकर्तेपणा ग्रामीण भागातील जनतेसमोर मांडणार आहे. त्यासाठी उद्या, दि. ८ ते १४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील जनतेशी चर्चा करण्यासाठी जनसंवाद यात्रा काढणार आहे, अशी माहिती माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. कदम म्हणाले, जिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढून काँग्रेस पक्ष मजबूत करणार आहे. तसेच तरुण मतदारांना खोटी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल जनजागृती करणार आहे. दहा तालुक्यात जाऊन लोकांशी संवाद साधणार आहे. ही यात्रा भारत जोडोच्या पार्श्वभूमीवर असणार आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन टप्प्यात रोज ३० किलोमीटर चालणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
प्रत्येक तालुक्यात रोज सायंकाळी सभा आहे. दि. ८ रोजी मिरज तालुका, दि. ९ रोजी जत, दि. १० रोजी आटपाडी, दि. ११ रोजी कडेगाव, दि. १२ रोजी तासगाव-कवठेमहांकाळ, दि. १३ रोजी शिराळा-वाळवा, आणि दि. १४ रोजी पलूस तालुका आणि त्याच दिवशी सांगलीत जनसंवाद यात्रेची सांगता आहे. दरम्यानच्या काही सभांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडट्टीवार उपस्थित राहणार आहेत.