लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना व भाजपच्यावतीने गुरुवारी ‘किसान आत्मनिर्भर यात्रा’ काढण्यात आली. कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा असून, विरोधक याबाबत दिशाभूल करीत असल्याचा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केला. यात्रेची सुरुवात क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या गावातून करण्यात आली. सांगलीवाडीमार्गे शहरातील स्टेशन चौक येथे यात्रा आली. त्याठिकाणी स्वागत करण्यात याले. यात्रेत सदाभाऊ खोत, पडळकर यांच्यासह आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, महापौर गीता सुतार, दीपक शिंदे, युवराज बावडेकर आदी सहभागी झाले होते.
यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, कृषी कायद्यातील तरतुदीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळणार आहे. दलालांची साखळी मोडीत निघणार आहे. त्यामुळे हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. आम्ही शेतकऱ्यांमध्ये यानिमित्त जागृती करत असून, शेतकरी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. पडळकर यांनीही या कायद्यामुळे शेतकरी कित्येक वर्षांच्या जाचातून मुक्त होणार असल्याचे सांगितले.