सांगली: मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार इस्लामपुरात उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक व मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअरचा डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला अटक करण्यात आली आहे. डॉ. वाठारकर याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होवून अटक झाल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कासेगाव येथील आचारी काम करणाऱ्या सलीम हमीद शेख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
सांगलीतील या धक्कादायक घटनेनंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार करण्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात इस्लामपूर येथे घडली आहे. राज्यकर्तेच खंडणीखोर असले तर कोणाला कशाला भीती वाटेल. पैशाने राज्यकर्तेच विकत घेतले की सगळे प्रकरण मूळापासून मिटवता येईल एवढा साधा हिशोब समाजकंटक करत आहेत, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
तत्पूर्वी, डॉ. वाठारकर याचे शहरात बस स्थानकाजवळ माणकेश्वर चित्र मंदिर परिसरात आधार हेल्थ केअर आहे. या हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षापासून कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांनी त्यांची आई सायरा ( वय ६०) यांना उपचारासाठी आधार हेल्थ केअर मध्ये दाखल केले होते. तेथे डॉ. योगेश वाठारकर याने उपचार केले. रुग्ण सायरा यांचा नॉन कोविड उपचारादरम्यान ८ मार्चला सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला. ही माहिती डॉक्टरांनी मुलगा सलीम शेख यांच्यापासून लपवली आणि मृतदेहावर उपचार सुरू ठेवले.
दोन दिवसांनी डॉ. वाठारकर याने नातेवाईकांना बोलावून रुग्ण मृत झाल्याची माहिती दिली. वास्तविक आईच्या उपचराबाबत दोन दिवस माहिती न दिल्याने शंका आली होती. सलीम यांना १० मार्चपर्यंत तुमच्या आईवर उपचार केल्याचे सांगून ४१ हजार २८९ इतके ज्यादा बिल बनावट कागदपत्रे तयार करून दिले आणि ते भरून घेतल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर याला अटक करण्यात आली. त्याच्यावर भा.दं.वि.कलम ४०६, ४२०, ४६४, २९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.