महेश देसाईशिरढोण : भाजप नेत्या नीता केळकर यांचा मुलगा सारंग श्रीरंग केळकर यांना गाडीवरील असलेला हेल्पलाइन नंबर का लागत नाही या कारणावरुन मारहाण करण्यात आली. तर यावेळी त्याच्याकडील एक हजार रुपयेही काढून घेण्यात आले. याप्रकरणी दोघांवर कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल, बुधवारी (दि.३१) देशिंग रोडवर घडली. सारंग केळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नंदकुमार नामदेव कर्पे आणि अनिल गोरख भंडारे (रा.करोली (टी) ता.कवठेमहांकाळ) यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नीता केळकर यांचा मुलगा सारंग हा कामानिमित्त कार घेऊन देशिंग कॉर्नर येथे उभा होता. त्यावेळी करोली (टी) येथील नंदकुमार कर्पे यांनी गाडीवर असलेला हेल्पलाइन नंबर बंद का आहे असे विचारुन अनिल भंडारे यांच्यासोबत मिळून सारंग केळकर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर खिशातील एक हजार रुपये काढून घेतले. घटनेची माहिती नीता केळकर यांना मिळताच त्या तात्काळ कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात आल्या. पोलिसांनी नंदकुमार कर्पे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. गुन्ह्यातील दुसरा आरोपी अनिल भंडारे हा अद्याप फरार आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे करीत आहेत.
सांगलीत भाजप नेत्याच्या मुलाला मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 7:28 PM