सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी भाजपकडून शनिवारी किंवा रविवारी बैठकीची तयारी करण्यात येत आहे. विधिमंडळ अधिवेशनामुळे सुट्टीचा दिवस निवडण्याचा प्रयत्न आहे.
बैठकीसाठी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती गरजेची आहे. विधिमंडळ अधिवेशन ८ मार्चपर्यंत चालणार आहे, त्यामुळे शनिवारी किंवा रविवारी बैठकीचे नियोजन केले जात आहे. तत्पूर्वी, गेल्या शुक्रवारी (दि. २६) कोल्हापुरात वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. चंद्रकांत पाटील यांच्यासह गाडगीळ, खाडे, खासदार संजय पाटील, मकरंद देशपांडे व पक्षाचे जिल्हाध्यक्ष यावेळी उपस्थित होते. पदाधिकारी बदलावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले. महापालिकेत पुरेसे बहुमत असतानाही सत्ता गमवावी लागली होती. जिल्हा परिषदेतही तशीच परिस्थिती ओढवू नये, अशी भूमिका नेतेमंडळींनी मांडली. त्यामुळे सावध पावले टाकण्यावर एकमत झाले.
मकरंद देशपांडे म्हणाले की, पदाधिकारी बदल करण्याविषयी निश्चितता आहे. सदस्यदेखील त्यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी शनिवारी किंवा रविवारी अधिवेशनाच्या सुट्टीच्या दिवशी सांगलीत बैठक होईल. अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार आरगच्या सदस्या सरिता कोरबू यांनी नेतेमंडळींच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद असल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, भाजपच्या सदस्यांनीही बदलासाठी व्यक्तिगत स्तरावर दबावतंत्र सुरू ठेवले आहे. प्रसंगी अविश्वास ठरावाचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे श्रेष्ठींपुढे बदलाशिवाय पर्याय राहिलेला नाही. अध्यक्ष कायम ठेवून अन्य सभापती बदलाचा पर्यायदेखील काहींनी पुढे आणला, पण सदस्यांनी तो फेटाळून लावला.
बदलाच्या घडामोडींवर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांचेही लक्ष आहे. अविश्वासाच्या हालचाली सुरू झाल्या तर एखाद्या पदाच्या बोलीवर तेदेखील मोहिमेत सामील होऊ शकतात, अशी चर्चा आहे.