जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार, शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील, बांधकाम व अर्थ सभापती जगन्नाथ माळी यांचा वर्षाचा कालावधी संपला आहे. यामुळे आटपाडीचे अरुण बालटे, भिलवडी (ता. पलूस)चे सुरेंद्र वाळवेकर, दरीबडची (ता. जत) येथील सरदार पाटील, दुधोंडी (ता. पलूस) येथील अश्विनी पाटील, आरग (ता. मिरज) येथील सरिता कोरबू, आदी इच्छुक सदस्यांनी भाजपच्या नेत्यांकडे पदाधिकारी बदलासाठी फिल्डिंग लावली आहे. सदस्यांची आक्रमक भूमिका लक्षात घेऊनच भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सदस्यांची भूमिका जाणून घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार चंद्रकांत पाटील दि. १४ रोजी सांगलीतील जि. प. अध्यक्षा कोरे यांच्या बंगल्यावर सकाळी ११ वाजता येणार आहेत. या ठिकाणी प्रथम भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर भाजपच्या सर्व सदस्यांशी पदाधिकारी बदलाबाबत चर्चा करणार आहेत. सदस्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर पदाधिकारी बदलायचे की नाही यावर अंतिम निर्णय चंद्रकांत पाटील घेणार आहेत.
झेडपी पदाधिकारी बदलासाठी भाजपची आज सांगलीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:24 AM