सदानंद औंधेमिरज : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह दीडशे जणांच्या जमावाने मिरजेत मध्यरात्री चार जेसीबीच्या साह्याने बसस्थानकाजवळ अमर थिएटर समोर दहा दुकाने जमीनदोस्त केली. यामध्ये एक कोटी तेरा लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार असून या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी विशाल दिलीपराव सन्मुख यांनी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह दीडशे जणाविरुद्ध मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर दुकाने व त्यामागे खाजा झोपडपट्टीच्या जागेचा वाद सुरु आहे. ही जागा ब्रह्मानंद पडळकर यांनी खरेदी केल्याचे सांगण्यात येते. पडळकर यांनी ही जागा मोकळी करण्यांसाठी संबंधित दुकानदार व रहिवाशांकडे यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले होते.
परंतू जागा रिकामी करीत नसल्याने वाद सुरु होता. मिरजेत शनिवारी मध्यरात्री ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह दोनशे जणांच्या जमावाने चार जेसीबीसह येऊन रस्त्यावरील दुकाने पडण्यास सुरुवात केली. यावेळी दुकानदार व झोपडपट्टीधारकांची पडळकरांसोबत जोरदार वादावादी झाली. यावेळी हाणामारीत मोहम्मद लियाकत सय्यद हा दुकानदार जखमी झाला आहे.दुकाने पडल्यानंतर पडळकर समर्थकांनी मागे असलेल्या झोपडपट्टीकडे मोर्चा वळविला. यावेळी झोपडपट्टीवासियांनी पडळकर समर्थकांवर जोरदार दगडफेक करीत प्रतिकार केला. जेसीबी व पडळकर समर्थकांच्या गाड्यांचीही तोडफोड केली. यात एक कोटी तेरा लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार आहे.
याबाबत माहिती मिळताच मिरज शहर, गांधी चौक व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुकाने व घरे पाडण्यासाठी वापरलेल्या चार जेसीबी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. संतप्त झोपडपट्टीधारक व दुकानधारकांनी पडळकर समर्थकावर कारवाईची मागणी केली.