मिरज : मिरजेत भाजपा आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर बेकायदा जमाव जमवून दगडफेक करीत टरबूज फोडणाऱ्या दहा शिवसेना कार्यकर्त्यावर मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल या सर्वाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेनेचे मिरज शहराध्यक्ष चंद्रकांत रामू मैगुंरे, विजय चंद्रकांत शिंदे, कुबेरसिंग विशालसिंग रजपूत, पप्पू ऊर्फ विवेक शिवाजी शिंदे, किरणसिंग रामसिंग रजपूत, महादेव हुलवान, रुक्मिणी आंबेगिरी, प्रकाश अहिरे, गजानन मोरे, शकील हयातचंद पिरजादे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे आमदार फुटल्याने मिरजेत त्याचे पडसाद उमटले.
शिवसेना शहराध्यक्ष चंद्रकांत मैगुरे यांच्यासह १० ते १५ कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोरील फलकावर दगडफेक करीत टरबूज फोडले. भाजपाचा निषेध केला. त्यानंतर महाराणा प्रताप चौकात जमावाने घोषणाबाजी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २८ जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू असतानाही व शिवसैनिकांनी बेकायदा जमाव जमून शांतता भंग केल्याबद्दल त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.