विटा : टेंभूचे पाणी काय स्वतःच्या सातबारावर कर्ज काढून आणले काय? असा सवाल खासदार संजय पाटील यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांना केला. तुम्ही ज्येष्ठ आहात, आम्ही तुमचा आदर करतो. पण कुणाला तरी बघून घेतो, कुणाच्या मागं इन्कम टॅक्स विभाग लावतो, हे चालणार नाही, सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही, संघर्ष आमच्या रक्तात आहे, असा इशाराही यावेळी खासदार पाटील यांनी दिला.हिंगणगादे (ता. खानापूर) येथे 'माझे गाव माझा अभिमान’ याअंतर्गत गावातील आजी-माजी सैनिक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सत्कारावेळी ते बोलत होते. शंकर मोहिते, राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील, अमरसिंह देशमुख, संजय विभूते, संग्राम माने उपस्थित होते.खासदार पाटील म्हणाले, टेंभूबाबत फार मोठ भाष्य केले पाहिजे, असे काही नाही. पण आपण सगळ्यांनी मिळून ते आणले. पण एक सांगतो, मी केले, तुम्ही केले आणि कुणी केले, तर काय स्वतःच्या सातबारावर कर्ज काढून कोणी काय करत नाही. हा लोकांचा पैसा आहे. लोकांसाठी खर्च करायचा आहे. ते कर्तव्य आहे, या भावनेतून आपण काम केले पाहिजे.अमरसिंह देशमुख म्हणाले, २०३४ पर्यंत फाटी शिवून देणार नाही. असे काही जण म्हणतात. मी एकटाच आहे, बाकी सगळी एकत्र आली तरी जमू देणार नाही, असेही म्हणतात. ही भाषा कुठून आली? आम्ही ताकद दिली. सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्ही जायला पाहिजे होते. पण तुम्ही फाटी आखली आहे. त्यावेळी आम्ही मदत केली नसती तर तुम्ही कोंड्यात तर आला असता का?वैभव पाटील म्हणाले, तुम्ही ‘टेंभूचं पाणी मी आणलं, मी टेंभूचा जनक’, म्हणून ऊर बडवून घेता. मग आता पाणी आल्यावर शेतकऱ्यांनी लावलेला ऊस घालण्यासाठी नागेवाडी कारखाना का सुरू करून देत नाही? खासदार पाटील गेली दहा वर्षे कारखाना सुरू करायचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही आडवे येता. हा कारखाना सुरूच होऊ नये यासाठी प्रयत्न करता आणि परत फाटीची भाषा करता. अडवा-अडवी, जिरवा-जिरवी करता, हे कुठं तरी थांबलं पाहिजे. म्हणून आम्हाला एकत्र यावं लागत आहे.
सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही, भाजप खासदाराने शिंदे गटाच्या आमदाराला लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 5:43 PM