दत्ता पाटील ल्ल तासगावजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वर्चस्व दाखवून देण्यासाठी तासगावात भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे फोडाफोडीचे राजकारण जोमाने सुरु आहे. फोडाफोडी करुन राजकीय दंगल घडविण्यास सुरुवात केली असून, राजकीय उलथापालथ घडविण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत.तासगाव तालुक्यात मागील दहा वर्षात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा म्हणावा तसा रंग भरलाच नाही. यापूर्वीच्या दोन निवडणुकांत आबा-काका समझोता एक्स्प्रेस धावल्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात राजकारणाची हलगी वाजली नाही. यावेळी मात्र आबा गट परंपरागत राष्ट्रवादीतून, तर काका गट पहिल्यांदाच भाजपच्या माध्यमातून निवडणुकीच्या फडात उतरणार आहे. कार्यक्रम जाहीर होण्याआधीच दोन्ही पक्षांतील इच्छुकांकडून शुड्डू ठोकण्यास सुरुवात झाली आहे. आर. आर. पाटील यांच्या पश्चात होत असलेल्या या निवडणुकीत बाजी मारुन तालुक्यावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून मोठ बांधण्यात येत आहे, तर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु आहे.कार्यकर्त्यांची फोडाफोडी आणि कुरघोडीचे राजकारणही जोमात आहे. राष्ट्रवादीने हातनोली, दहीवडी येथील भाजपच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेतले आहे, तर भाजपनेही राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देसाई यांच्या गव्हाणमधील काही ग्रामपंचायत सदस्यांसह, उपळावी, योगेवाडी, कुमठेतील काही कार्यकर्त्यांना भाजपमय केले आहे.दोन्ही पक्षांकडून एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. काँग्रेसकडूनही काही गटात गळ टाकण्यात आले आहेत. उमेदवारीचे नेमके चित्र स्पष्ट झाल्यानंतर राजकीय दंगल उसळणार असल्याचेही संकेत या फोडाफोडीतून मिळत आहेत.
तासगावात भाजप, राष्ट्रवादीची ‘दंगल’
By admin | Published: January 11, 2017 11:49 PM