तासगाव : राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. तासगावात मात्र राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सेटलमेंट आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील धाेरणानुसार आम्ही दोन पावले मागे घेऊन महाविकास आघाडीसाठी तयार आहोत. मात्र राष्ट्रवादीने भाजपशी असलेली छुपी युती तोडली पाहिजे. अन्यथा आम्ही स्वबळावर सर्व जागा लढवू, अशी घोषणा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी केली.
तासगाव येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, जितेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य तुकाराम माळी, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष खोत, जिल्हा समन्वयक अमित पारेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महादेव पाटील म्हणाले, १५ वर्षे आर. आर. पाटील व आता संजय पाटील यांनी नगरपालिकेची वाट लावली. भाजपने तर आता भ्रष्टाचाराचे कुरण करून टाकलंय. नगरपालिकेच्या शेवटच्या टप्प्यात इच्छुक उमेदवारांना ४० ते ५० लाखांची कामे दिली. त्यातून पैसा मिळवा व फंड उभारा म्हणून सांगितले. तासगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक आहेत. भाजपच्या भानगडीत त्यांचाही सहभाग आहे. ८० कोटींची भुयारी गटार फक्त ३ माणसांनी केली. हा सारा पैसे मिळवायचा धंदा आहे.
खासदारांचे बगलबच्चे यात सहभागी असून राष्ट्रवादी तोंडातून ब्र काढत नाही. कारण त्यांच्या ताब्यातील बाजार समितीत ५५ कोटींचा भ्रष्टाचार आहे. तुम्ही नगरपालिकेवर बोलायचं नाही, आम्ही बाजार समितीवर बोलत नाही. अशी सेटलमेंट सुरू आहे. भाजपला गाडायला महाविकास आघाडी न झाल्यास काँग्रेसने नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढायची तयारी केली आहे.
यावेळी आटपाडी तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, मिरज तालुका अध्यक्ष आण्णासाहेब कोरे, जत तालुका अध्यक्ष आप्पासाहेब बिराजदार, इस्लामपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष अजय पवार, महेश पाटील, रवी साळुंखे, विवेक गुरव, गजानन कुत्ते आदी उपस्थित होते.
कारखान्यावर युवा नेता का बोलत नाही : महादेव पाटील
तासगाव कारखाना खासदारांनी कवडीमोल किमतीत पदरात पाडून घेतला. तरीही राष्ट्रवादी गप्प आहे. त्या कारखान्याचे १५ कोटींचे ऊसबिल थकले आहे. तरीही राष्ट्रवादी गप्प आहे. शेतकरी देशोधडीला लागलाय. मात्र राष्ट्रवादीचा युवा नेता यावर का बोलत नाही? असा सवाल महादेव पाटील यांनी रोहित पाटील यांचे नाव न घेता केला.