सांगली : मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लोकांनी राज्यातील शिवसेनेचे ४२ आमदार पाडले त्याबद्दल शिंदे गटात गेलेले आमदार न बोलता राष्ट्रवादीवर टीका करीत आहेत. भाजपने कधीही शिवसेना मोठी होऊ दिली नाही, अशी टीका सांगलीचेशिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.विभुते म्हणाले की, आजवर शिवसेना आपल्यामुळेच चालत होती, असा गैरसमज काहींनी करुन घेतला होता. त्यांच्यामुळे पक्ष नव्हे तर पक्षामुळे त्यांचे अस्तित्व होते. लवकरच त्यांना याची प्रचिती येईल. जे शिवसेनेचे झाले नाहीत, ते कोणाचेही होऊ शकणार नाहीत. त्यांनी ज्या गटात प्रवेश केला तिथे तरी प्रामाणिकपणे रहावे. आ. अनिल बाबर यांच्या खानापूर मतदारसंघात मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. जिल्ह्यातील ९२ टक्के पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचा गड मजबुत आहे.खानापूर, आटपाडी तसेच इस्लामपूरमध्ये पूर्वीपेक्षा शिवसेना अधिक मजबुत झालेली दिसेल. आनंदराव पवार यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले, मात्र त्यांनी आता शिवसेना सोडली आहे. इस्लामपुरातील १० हून अधिक दिग्गज उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे येथील निवडणूक ताकदीने लढवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपने कधीही शिवसेना मोठी होऊ दिली नाही, राष्ट्रवादी परवडली; शिवसेना जिल्हाप्रमुखाचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 6:58 PM