सांगली : जिल्ह्यात भाजपमध्ये एकही लायकीचा नेता नाही. पक्षातील एकनिष्ठांना किंमत दिली जात नाही. माझा भाजपशी काही संबंध नाही. जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधामुळेच आमदार सुरेश खाडे, आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळाले नाही, अशा शब्दात टीका करुन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.
सिंचन योजनांचे पाणी सोडण्यासाठी राजीनामा देण्याची वेळ येते, हे कसले नेते, अशा शब्दात खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली.सांगलीत शुक्रवारी पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पक्षात माझी कसलीही घुसमट होत नाही. मुळात मी जिल्ह्यातील कुणाला माझा नेता मानत नाही. मी संघर्षातूनच राजकारणात प्रवेश केला आहे.
मला कोणताही राजकीय वारसा नाही. यामुळे मला संपविण्याची कुठल्याच नेत्याने भाषा करु नये. माझे घर उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आपले स्वत:चे घर सांभाळावे. मी खंबीर आहे. आजवर मी संघर्षच केला आहे. यापुढेही लढत राहणार आहे. जिल्ह्यातील भाजपमध्ये एकही लायकीचा नेता नाही, त्यांचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी.खाडे आणि नाईक यांचे मंत्रीपद कुणामुळे गेले. त्यांच्या मंत्रिपदाला जिल्ह्यातील नेत्यांनीच विरोध केला. त्यामुळे जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळू शकले नाही, असा आरोपही पडळकर यांनी केला.
आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि जयंत पाटील हे तिघे जिल्ह्याचे मंत्री होते. ते सांगलीत बसून राज्याचे निर्णय घेत होते. मात्र आज भाजपच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दोन-दोन तास वाट पाहत बाहेर बसावे लागते, अशी टीकाही त्यांनी केली.
संजय पाटील यांचे नाव न घेता पडळकर यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘पाणी सोडण्यासाठी राजीनामा देण्याची धमकी देण्याची वेळ येते. माझ्या तिकिटाची काळजी कुणी करु नये. मी अनेकवेळा लढलोय. यापुढेही जनतेच्या हितासाठी लढत राहणार आहे.’’माझे घर उठविता : स्वत:चे घर सांभाळापत्रकार परिषद घेताना पडळकर यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, माझी कसलीही घुसमट होत नाही. मुळात मी जिल्ह्यातील कुणाला माझा नेताच मानत नाही. जिल्ह्यात भाजपमध्ये एकही त्या लायकीचा नेता नाही. माझे घर उठवण्याचा प्रयत्न करणाºयांनी आपले स्वत:चे घर सांभाळावे. आजवर मी संघर्षच केला आहे. यापुढेही दुष्काळी जनतेच्या हितासाठी लढतच राहणार आहे.पडळकर विनोद तावडे समर्थकभाजपमध्ये ते शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे समर्थक मानले जातात. आटपाडी तालुक्यात त्यांनी स्वतंत्र स्थान तयार केले आहे. आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुखही भाजपमध्ये दाखल झाले. काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांचा दोस्ताना जगजाहीर आहे. त्यामुळे पडळकर आता एकाकी पडले आहेत. यातूनच पडळकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये होणाºया घुसमटीला मोकळी वाट करून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.