सातारा/काशीळ : महामार्गालगत लघुशंकेसाठी थांबलेले भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार आत्माराम ननावरे (वय ३९, रा. कोळकी, ता. फलटण) यांच्यावर दोन युवकांनी गोळीबार केला. मात्र, यामध्ये ते बालंबाल बचावले. ही थरारक घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बोरगावजवळ घडली.नंदकुमार ननावरे हे शनिवारी दुपारी कारमधून कऱ्हाडला गेले होते. रात्री ते परत फलटणला निघाले होते. बोरगावजवळील उड्डाणपुलाच्या पुढील बाजूस आल्यानंतर त्यांनी लघुशंकेसाठी कार थांबविली. कारच्या पाठीमागील बाजूस उभे असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. मोठा आवाज झाल्याने त्यांनी पाठीमागे वळून पाहिले असता दुचाकीवर दोन युवक होते. त्यातील पाठीमागे बसलेल्या युवकाच्या हातात पिस्तूल होते. काही क्षणातच दोघेही हल्लेखोर तेथून पसार झाले. ननावरे यांच्या कारमधील सीटवर गोळी लागल्याच्या खुणा आहेत. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या ननावरे यांनी तत्काळ बोरगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली; परंतु हल्लेखोर सापडले नाहीत. गोळीबार झाल्याचे समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासाच्या अनुषंगाने त्यांनी बोरगाव पोलिसांना सूचना केल्या. पोलिसांना घटनास्थळी पिस्तूलमधील पुंगळी सापडली आहे. ही पुंगळी चाचणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याचे बोरगाव पोलिसांनी सांगितले. संबंधित दोन अनोळखी युवकावर ३०७ (खुनाचा प्रयत्न)चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
भाजपचा पदाधिकारी गोळीबारातून बचावला
By admin | Published: February 19, 2017 11:01 PM