सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या प्रतिमेचे भाजपा युवा मोर्चाच्यावतीने दहन करण्यात आले. तांबे यांच्यासह काँग्रेसच्या एकूणच आंदोलनपद्धतीचा निषेध व्यक्त करत भाजपानंही निदर्शने केली. राजवाडा चौकात शुक्रवारी (12 ऑक्टोबर) संध्याकाळी आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं केलेल्या आंदोलनादरम्यान तांबे मोदींच्या प्रतिमेस काळे फासले होते. याचा निषेध भाजपा युवा मोर्चाच्यावतीने तांबे यांच्या प्रतिमेचे दहन करुन त्यांच्याविरोधात निदर्शने केली.
(मोदींच्या फलकाला फासलं काळं; काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध)
युवा मोर्चाचे अध्यक्ष जयगोंड कोरे म्हणाले की, संपूर्ण जगात भारताची मान उंचावेल अशी नवीन ओळख पंतप्रधानांनी करून दिली आहे. तरी पंतप्रधानांचा असा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. तर सरचिटणीस चेतन माडगुळकर म्हणाले, पंतप्रधान हे पद संविधानिक असून अखंड भारताचे नेतृत्व करणा-या पंतप्रधानांचा अशा प्रकारे अपमान जनता कधीही सहन करणार नाही व असे कृत्य करणा-यांना वेळीच उत्तर मिळेल.
( इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक, पेट्रोल पंपावर केली दगडफेक )
भांबावलेल्या काँग्रेस पक्षाने स्वत:चे चारित्र्य एकदा तपासून पाहावे व पंतप्रधान या संविधानिक पदाचा कायम मान राखावा, असे आवाहनही यावेळेस भाजपाकडून करण्यात आले. शिवाय,काँग्रेस व त्यांच्या नेत्यांबाबत नाराजी व्यक्त करत घोषणाबाजीही करण्यात आली.