भाजपचे संजयकाका पाटील अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात, संजयकाका विरुद्ध रोहित पाटील ‘कांटे की टक्कर’ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 11:59 AM2024-10-24T11:59:21+5:302024-10-24T12:06:51+5:30

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २९ ऑक्टोबरला अर्ज..

BJP Sanjaykaka Patil finally joins Nationalist Ajit Pawar group, Fight between Sanjay Kaka vs Rohit Patil | भाजपचे संजयकाका पाटील अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात, संजयकाका विरुद्ध रोहित पाटील ‘कांटे की टक्कर’ होणार

भाजपचे संजयकाका पाटील अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात, संजयकाका विरुद्ध रोहित पाटील ‘कांटे की टक्कर’ होणार

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत यावेळी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी घड्याळ हातात घेतले आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. याचवेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनीही संजय पाटील यांना साथ देण्याची भूमिका जाहीर केली. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित मानला जात आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ महायुतीत कोणत्या पक्षाला जाणार? आणि उमेदवार कोण असणार? याबाबत सातत्याने चर्चा होत्या. या चर्चेवर बुधवारी मुंबईत पडदा पडला. हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षातून भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरविण्याचा निर्णय झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांनी एकत्रित भेट घेतली. यावेळी तिसऱ्या आघाडीचे स्वप्निल पाटील व पांडुरंग पाटील यांच्यासह घोरपडे समर्थक उपस्थित होते. यावेळी संजयकाका पाटील विधानसभा निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब झाले.

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २९ ऑक्टोबरला अर्ज..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संजयकाका पाटील विधानसभा निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार आहेत.

संजयकाकांचे वर्तुळ पूर्ण 

तासगाव तालुक्यात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील यांचे २००८ साली मनोमिलन झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजयकाका सहा वर्षे विधान परिषद सदस्य होते. २०१४ ला त्यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला. तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे संजयकाकांचे एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाले आहे.

कांटे की टक्कर..

दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या येथील विद्यमान आमदार आहेत. त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यांचे पुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी शरद पवार गटाकडून नक्की मानली जात आहे. तसे झाल्यास संजयकाका विरुद्ध रोहित पाटील अशी ‘कांटे की टक्कर’ येथे होईल.

Web Title: BJP Sanjaykaka Patil finally joins Nationalist Ajit Pawar group, Fight between Sanjay Kaka vs Rohit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.