ते म्हणाले, महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रत्येक नगरसेवकास प्रभागनिहाय निधीची तरतूद केलेली आहे. कोणत्याही नगरसेवकांची बायनेम कामे धरलेली नाहीत. महत्त्वाचे रस्ते दुरुस्ती व नवीन रस्ते, चौक सुशोभिकरण आदी कामांचा समावेश केला आहे. त्यामुळे कोणी हेतूपुरस्सर नागरिकांची दिशाभूल करू नये. सांगली व मिरज शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये अशा ५० लाख रुपयांची तरतूद स्थायी सभापतींनी केली होती. त्यात कपात केलेली नाही. भाजपचा आक्षेप चुकीचा आहे. ड्रेनेजसाठी कुपवाड गावठाण येथील रस्त्याची खोदाई होणार आहे. याचे अंतरही कमी आहे. या रस्त्याऐवजी बामणोली ते कुपवाड ६० फुटी रुंदीकरणासह करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विरोधकांनी दिशाभूल करून भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये.
बायपास ते माधवनगर नाका हा जुना बुधगाव रस्ता का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी उपमहापौरांनी शंभर कोटींच्या निधीतून किंवा उपमहापौर असताना महापालिकेच्या निधीतून हा रस्ता का केला नाही? असा सवाल महापौर सूर्यवंशी यांनी केला.
चौकट
स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही
वसंतदादा पाटील स्फूर्तीस्थळ दुरुस्तीसाठी १० लाखांची तरतूद केली आहे. प्रशासनाकडून व स्थायी समितीकडून सुचविण्यात आलेल्या अंदाजपत्रकामध्ये कोणताही बदल केलेला नाही. थोर पुरुषांचे पुतळे, स्मारके यांसाठी निधी कमी पडू देणार नाही. भविष्यात वाढीव निधीची आवश्यकता भासल्यास चौमाही अंदाजपत्रकामध्ये तरतूद केली जाईल, असेही महापौर सूर्यवंशी म्हणाले.