सांगली : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील भाजपअंतर्गत सुरू असलेली खदखद विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर अधिक उफाळून येत आहे. उमेदवारी ठरविताना किंवा कोणताही निर्णय घेताना जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांनाही विचारात घेतले जात नसल्याने अंतर्गत नाराजी विकाेपाला गेली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या सांगलीतील नेत्यांच्या व पक्षाला पाठबळ देणाऱ्या एका संघटनेच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्या एकाधिकारशाहीवरही नाराजी व्यक्त करण्यात आली.
भाजपअंतर्गत गटबाजी व संघर्षास गेल्या चार वर्षापासून सुरूवात झाली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तेव्हा एक गटही स्थापन झाला होता, मात्र त्यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी त्यांना शांत केले. आता नाराजांच्या या गटात समजूत घालणारे काही नेतेही सहभागी झाले आहेत. यापूर्वी निष्ठावंत ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना डावलले जात होते, मात्र आता नेत्यांनाही मुख्य निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नसल्याने त्यांच्या नाराजीचीही भर पडली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या बाजूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची तयारी अधिक असते. यंदा संघाचे काही कार्यकर्तेही नाराज असल्याचे दिसून येते. त्यामुळे पक्षात समाधानी कमी आणि नाराज अधिक, अशी स्थिती आहे.
भाजप यापूर्वी सूक्ष्म नियोजन व त्याची योग्य अंमलबजावणी यासाठी ओळखला जात होता, आता त्यांची ही व्यवस्था अंतर्गत नाराजीतून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीवर होताना दिसत आहेत. पदवीधरच्या निवडणुकीत परस्पर घेतले गेलेले निर्णय अनेकांना खटकले. त्यामुळे निवडणुकीत राबणाऱ्यांची फळी विस्कळीत झाली.
चौकट
विरोधकांपेक्षा आपलेच जबाबदार
विरोधी पक्षाच्या ताकदीपेक्षा भाजपमधील एकाधिकारशाही व अविश्वासाच्या राजकारणानेच पराभव झाल्याची भावना काही नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.
चौकट
वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची तयारी
भाजपमधील काही पदाधिकारी व नेते या खटकणाऱ्या गोष्टीबद्दल उघडपणे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार आहेत. पराभवाची कारणमीमांसा करीत त्याचा अहवालही दिला जाणार आहे.