दिलीप मोहिते
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघाची सर्वात मोठी ''व्होट बॅँक'' असलेल्या विटा नगरपरिषदेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर आ. गोपीचंद पडळकर यांनी रणशिंग फुंकले आहे. पालिका निवडणुकीत सर्व प्रभागांत भाजपचे उमेदवार देऊन ''कमळ'' फुलविण्याचा निर्धार करण्यात आला असून, दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
विटा नगरपरिषदेवर गेल्या पन्नास वर्षांपासून माजी आ. सदाशिवराव पाटील यांची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता उलथून टाकण्यासाठी अनेक निवडणुकांत मोठा राजकीय संघर्ष पाहावयास मिळाला. परंतु, त्यात फारसे यश आले नाही. नगरपरिषदेच्या गत निवडणुकीत विद्यमान आ. अनिल बाबर यांनी माजी आ. सदाशिवराव पाटील यांना शह देण्यासाठी कडवा विरोध केला. त्यावेळी शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले होते.
सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेणार? असा सवाल शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून उपस्थित होत आहे. परंतु, पुढील निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरणार आहे. आ. पडळकर यांनी नगरपरिषदेच्या येणाऱ्या निवडणूक भाजपच्या ''कमळ'' चिन्हावर लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
चौकट :
तिरंगी लढतीचे संकेत
सध्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी, स्थानिक पातळीवर आघाडीत बिघाडी होऊ शकते. कारण ही निवडणूक आजी-माजी आमदारांच्या प्रतिष्ठेची समजली जाते. शिवसेनेचे आ. बाबर हे माजी आ. पाटील यांचे मतदारसंघातील राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे आजी-माजी आमदारांना स्वत:चा गट मजबूत ठेवण्यासाठी महाविकास आघाडी परवडणारी नाही. परिणामी, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप हे विटा नगरपालिकेसाठी स्वतंत्र लढतील, असे संकेत आहेत.
चौकट :
भाजपमध्ये इनकमिंग सुरू...
विटा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून सत्ताधारी गटाचे माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांसाठी आ. गोपीचंद पडळकर यांनी भाजपचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. गेल्या आठवड्यात माजी आ. पाटील समर्थक काही कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे आऊटगोईंग सुरू झाले आहे.
फोटो - २११२२०२०-विटा -नगरपरिषद इमारत. हा फोटो वापरणे.