सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीतील पराभव भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता प्रभाग १६ मधील पोटनिवडणूक भाजपच्यावतीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते; पण त्याला आता खीळ बसणार आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १६ अ मधून काँग्रेसचे माजी महापौर हारुण शिकलगार विजयी झाले होते. त्यांचे गेल्यावर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. या जागेसाठी आता पोटनिवडणूक होणार असून, मतदार यादीचा कार्यक्रम सुरू आहे. प्रारूप मतदार यादीवर एकही हरकत न आल्याने तीन मार्च रोजी ही यादी अंतिम केली जाणार आहे.
काँग्रेसने या पोटनिवडणुकीसाठी शिकलगार यांच्या घरातीलच व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत असून, ही जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजपमधील एका गटानेही ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र आता गणिते बदलली आहेत. महापौर, उपमहापौर निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपच्या सत्तेला सुरूंग लावला. त्यामुळे भाजपची नेतेमंडळी दुखावली आहेत. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आता पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला असून, ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी स्पष्ट केले.