जत : जत तालुक्यातील वंचित गावांच्या पाण्यासाठी भाजपा पुढील महिन्यापासून जनआंदोलन सुरू करणार असल्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितले. संख ते खंडनाळ रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार जगताप यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जतच्या शिवारात जोपर्यंत कर्नाटकातुन पाणी येत नाही तोपर्यत फक्त ऐकायचं काम करायचं असा टोलाही नाव न घेता विद्यमान आमदारांना लगावला.
जगताप म्हणाले, कर्नाटक राज्यातून जत पूर्व भागात पाणी आणण्यासाठी आपापल्या परीने सगळेजण प्रयत्न करीत आहेत. चार-पाच दिवसापूर्वी जतवर नेहमीच प्रेम करणारे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांची बंगळुरु येथे बैठक घेऊन जतला पाणी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली, दोन्ही राज्यात यासंदर्भात आंतरराज्य करार करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. यामुळे पावसाळ्यासह उन्हाळ्यातही दोन्ही राज्यांच्या समन्वयाने हे पाणी जत तालुक्याला मिळणे शक्य होणार आहे. जत तालुक्याच्या दृष्टीने कुठलाही पक्षीय वैचारिक मतभेद न मानता घेण्यात आलेल्या हा निर्णय अभिनंदनीय व क्रांतिकारी असा आहे. जतच्या शिवारात जोपर्यंत पाणी येत नाही, तोपर्यंत जनतेने ऐकायचे काम करायचे, कारण जोपर्यत दोन्ही राज्यामध्ये करार होत नाही ताेपर्यंत पाणी येणार कसे? अशी चर्चा भारतीय जनता पक्षाच्यावतीने अनेक वेळा केली आहे. यात काय नवीन नाही. येत्या काही दिवसात आम्हीदेखील यावर चर्चा करणार आहाेत.
यावेळी माजी सभापती तम्मनगौडा रवी-पाटील उपस्थित होते.