ओळी : आशा सेविकांच्या संपाला भाजप कामगार महिला आघाडीने पाठिंबा दिला. याबाबतचे निवेदन सीईओ जितेंद्र डुडी यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यातील ७२ हजार आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या बेमुदत संपाला भाजप महिला कामगार आघाडीने पाठिंबा दिला आहे. शासनाने आशा सेविकांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणीही आघाडीच्यावतीने करण्यात आली.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कामगार आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश मोहिते, शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलजा कोळी उपस्थित होते. गेल्या वर्षापासून कोरोनाच्या संकटामध्ये जिवाची पर्वा न करता, लोकांच्या घरोघरी जाऊन रुग्णांचा सर्वे करणे, त्यांना उपचारासाठी आरोग्य केंद्रामध्ये पाठवणे, लसीकरण केंद्र, विलगीकरण केंद्रामधील आशा सेविकांनी मानधनवाढ, दैनंदिन भत्ता वाढ, शासकीय सेवेत कायम नियुक्तीसह १६ मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या सेविकांच्या मागण्यांची दखल घेत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी शहर जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष प्रियानंद कांबळे, गजानन मोरे, राहुल ढोपे-पाटील, अरुण आठवले, राज कोळी, प्राजक्ता कुरणे, कविता चिंचणे, सुषमा माणगावकर, संगीता खटाळ, गीता आवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.