इस्लामपूर : पक्षाने अन्याय केला म्हणून आम्ही कार्यकर्ते तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत लढायचेच आहे. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत लढण्याचा शब्द देत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा पवित्रा घेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी निशिकांत भोसले-पाटील यांच्या घरासमोर आक्रोश केला. दोघा कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. पाटील यांनी अखेर उमेदवारी दाखल करण्याची घोषणा केली.
इस्लामपूर मतदारसंघातून शिवसेनेकडून गौरव नायकवडी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमधील इच्छुक नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. बुधवारी येथील कामेरी रस्त्यावरील अक्षर कॉलनीतील पाटील यांच्या निवासस्थानाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने निराश झालेल्या कार्यकर्त्यांनी, पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करावी, यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी ‘पक्ष तर पक्ष, नाही तर अपक्ष’ असा निर्धार करत निशिकांत पाटील यांना निवडणूक लढविण्याची गळ घातली.
पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मॅनेज’ करणारा अजून जन्माला यायचा आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. भीतीपोटी विरोधकांशी तडजोड करणाऱ्यांचा हिशेब चुकता करू. कार्यकर्त्यांच्या बळावर गुरुवारी सर्वांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज भरून लढू.
माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, निशिकांत पाटील हेच खरे उमेदवार आहेत. विरोधकांनी त्यांच्या उमेदवारीची धास्ती घेतल्याचे सिध्द झाले आहे. निवडणूक लढण्यास या क्षणापासून कामाला लागा.
यावेळी भाजपचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा मटकरी, युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोरे, प्रवीण माने, चंद्रशेखर तांदळे, धनराज पाटील, शिवाजी पवार, मुकुंद कांबळे, नगसेविका मंगल शिंगण, कोमल बनसोडे, सरपंच गणेश हराळे, बागणीचे सरपंच संतोष घनवट, येडेमच्छिंद्रचे उपसरपंच रणजित पाटील, यदुराज थोरात आदी उपस्थित होते.
अंगावर रॉकेल ओतून घेतलेनगराध्यक्ष पाटील यांच्या निवासस्थानासमोर आक्रमक झालेले कार्यकर्ते आक्रोश करत होते. याचदरम्यान आष्टा येथील रवींद्र चव्हाण आणि आप्पासाहेब शिंदे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडील लायटर आणि आगपेटी हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला.